पाचगावला पूर्ण क्षमतेने पाणी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:18 AM2021-04-29T04:18:17+5:302021-04-29T04:18:17+5:30
पाचगाव : पाचगाव ग्रामपंचायतीची जीवन प्राधिकरणाकडे कोणतीही थकबाकी नाही. त्यामुळे पाचगावला पूर्ण क्षमतेने पाणी द्या, अशी मागणी शिवसेनेच्या ...
पाचगाव : पाचगाव ग्रामपंचायतीची जीवन प्राधिकरणाकडे कोणतीही थकबाकी नाही. त्यामुळे पाचगावला पूर्ण क्षमतेने पाणी द्या, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. पाचगावातील नागरिकांना वेळेत आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी पाण्यामध्ये कोणतेही राजकारण करू नका, असे आवाहनही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले. पाचगावचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी एमजीपीचे कार्यकारी अभियंता डी.के. महाजन यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महापालिकेचे जल अभियंता नारायण भोसले, उपअभियंता ए. डी.चौगले, शाखा अभियंता एन. बी. , व्ही. एन. घेवडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, पाचगावसाठी जीवन प्राधिकरणकडून पुरवठा होणारा पाणी पुरवठा अनियमित व अपुरा असल्याने नागरिकांना पाण्यासाठी दिवसभर वणवण करावी लागते. पाचगाव ग्रामपंचायतीची थकबाकी नाही. त्यामुळे पाचगावचा पाणीपुरवठा वाढवून पूर्ण क्षमतेने पाणी द्यावे अशी मागणी शिवसेना करवीर तालुका प्रमुख विराज पाटील यांनी केली. पाचगावसाठी पुरवठा करण्यात येणारे पाणी लोकसंख्येच्या तुलनेत तुटपुंजे असून वेळेत व अपुऱ्या होणाऱ्या पुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. पूर्वीपेक्षा कमी व्यासाची व अर्धवट खुदाई करून टाकलेल्या पाईपलाईनची क्वालिटी कंट्रोलकडून थर्ड पार्टी चौकशी करण्याची मागणीही या निवेदनात केली आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, पाणीप्रश्नाबद्दल कोणतेही राजकारण न करता पाचगाववासीयांना मुबलक पाणी मिळालेच पाहिजे. पाचगावच्या पाण्यासाठी अनेक वेळा आंदोलने करूनही लोकप्रतिनिधींनी याकडे कानाडोळा केला आहे. परंतु यापुढील काळात पाणीप्रश्न मिटत नाही तोपर्यंत रस्त्यावर उतरून लढाई करू.
तालुकाप्रमुख विराज पाटील यांनी झालेल्या कामातील त्रुटींचा पाढा अघिकाऱ्यांसमोर वाचत झालेल्या कामाची प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्याचीही मागणी करीत प्रशासनाला धारेवर धरले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, तालुकाप्रमुख राजू यादव उपस्थित होते.
फोटो -२८ पाचगाव पाणी निवेदन
ओळ : पाचगावचा पाणीप्रश्न तत्काळ सोडवावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता डी. के. महाजन यांच्याकडे करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, तालुकाप्रमुख राजू यादव, करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील, आदी उपस्थित होते.