शिरोळमध्ये पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:27 AM2021-09-14T04:27:27+5:302021-09-14T04:27:27+5:30
* ओल्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर कुरुंदवाड : गेल्या चार दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात बरसणाऱ्या पावसामुळे व धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने ...
* ओल्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर
कुरुंदवाड : गेल्या चार दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात बरसणाऱ्या पावसामुळे व धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने पंचगंगा नदी पुन्हा पात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे नदीकाठची पोटमळी पाण्याखाली गेल्याने ओल्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, राधानगरी व कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे शिरोळ तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे.
गेल्या चार दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राधानगरी, काळम्मावाडी धरणातील पाण्याचा विसर्ग होत असल्याने पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली आहे. महापुरामुळे ऊस पिकासह इतर पिके, चाऱ्याची पिके गेल्याने ओल्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली होती. पूर ओसरल्याने नदीकाठी असलेले गवत कापणीस आल्याने ओला चाऱ्याचा प्रश्न काहीअंशी मिटला होता. मात्र, पंचगंगा नदी पुन्हा पात्राबाहेर पडल्याने पोटमळीत असलेले गवती कुरण पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे ओल्या चाऱ्याचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे. चाऱ्यासाठी पर्याय उपलब्ध करावा लागत आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू राहिल्यास पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे.
-------------------
शेतकरी चिंतेत
महापुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. पूर ओसरून नदीबुड क्षेत्रात नवीन पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून तयारी सुरू असतानाच पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत पडला आहे. कारखाने सुरू होऊन बुडीत ऊस केव्हा गाळपास जाईल, अशा प्रश्नांच्या विवंचनेत शेतकरी आहे.
कोट - पोटमळीत असलेल्या गवती कुरणामुळे ओल्या चाऱ्याचा प्रश्न मिटला होता. मात्र, पुन्हा नदी पात्राबाहेर पडल्याने कापणीस आलेले गवती कुरण पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे ओल्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
- आलगोंडा पाटील, शेतकरी शिरढोण
फोटो - १३०९२०२१-जेएवाय-०३, ०४
फोटो ओळ - ०३) धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने कुरुंदवाड-शिरढोण पुलावरील पंचगंगा नदीचे पात्र पसरले आहे.
०४) पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शिरोळ-कुरुंदवाड दरम्यान जुन्या रस्त्यावरील अनवडी पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे.