प्रदूषणयुक्त पाणी थेट रंकाळ्यात--बरगे घालण्याचा पालिकेस विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 01:34 AM2017-10-06T01:34:04+5:302017-10-06T01:34:24+5:30
कळंबा : काही दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने नालेसफाई अभावी ओढ्याखालील, अरुंद नळांसह छोट्या नळांमध्ये पाणी तुंबले.
अमर पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबा : काही दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने नालेसफाई अभावी ओढ्याखालील, अरुंद नळांसह छोट्या नळांमध्ये पाणी तुंबले. पाण्याचा जोर प्रचंड असल्याने राजलक्ष्मीनगर प्रभागातील शाम हौसिंग सोसायटीनजीकच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या ओढ्यावरील बरगे नगरसेविका दीपा मगदूम यांनी नागरी वस्तीत पाणी शिरू नये यासाठी प्रशासनास काढण्यास भाग पाडले; पण नंतर हे बरगे पूर्ववत घालणे क्रमप्राप्त होते; पण प्रशासनास याचाच विसर पडला आहे.
उपनगरातील साळोखेनगर, तपोवन, राजलक्ष्मीनगर प्रभागांतील ओढ्यांचे पाणी राजलक्ष्मीनगरातील ओढ्यात एकत्र मिळते. पुढे हे पाणी राजलक्ष्मीनगरातील शाम हौसिंग सासोयटीनजीकच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील प्रकल्पातून प्रक्रिया होऊन रंकाळ्यात मिसळते.
शाम हौसिंग सोसायटीनजीकच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात सिलिंडर सदृश इमारतीतील मोरीत पंपाद्वारे पाणी उपसा केले जाते. यात विविध प्रकारची रासायनिक औषधे मिसळली जातात. तसेच प्रक्रिया केली जाते. यातील जलपर्णी वाढविल्यास प्रदूषण निर्मितीस कारणीभूत असणारे जिवाणू मारले जातात व ते पाणी प्रक्रिया करून पुन्हा रंकाळ्यात सोडले जाते. पंप उपसा बंद पडला की, बंधाºयातील पाण्याची पातळी वाढते. त्यानंतर हे प्रदूषणयुक्त पाणी थेट रंकाळ्यात मिसळते. याठिकाणी दोन शिफ्टमध्ये कर्मचारी नियुक्त आहेत; पण बहुतांश वेळा केंद्र बंद, तर कर्मचारी गायब असे आजचे चित्र आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने ओढे तुंबून पावसाचे पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरून हजारांवर कुटुंबांच्या प्रापंचिक साहित्यांचे नुकसान झाले. वाहने वाहून गेली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.यावेळी या केंद्रावरील बरगे काढण्यात आले खरे; पण महिना उलटला तरी बरगे पूर्ववत बसविण्याचे भान प्रशासनास राहिले नाही. कसेही अस्ताव्यस्त पडलेले बरगे प्रशासन बसविणार कधी? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रत्येक पावसाळ्यात केंद्र पाण्याखाली
या प्रकल्पाच्या बंधाºयाची उंची इतकी कमी झाली आहे की, प्रत्येक मुसळधार पावसात हे केंद्र निम्मे पाण्याखाली व पाणी प्रक्रिया न होताच थेट रंकाळ्यात मिसळते. या केंद्राजवळची सफाईही करण्यात आलेली नाही.
शाम हौसिंग सोसायटीनजीकच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काढलेले बरगे पूर्ववत बसविण्याचा प्रशासनाला विसर पडला आहे.