तलावातील पाणी शुद्धिकरणाची रडच
By Admin | Published: March 27, 2015 11:15 PM2015-03-27T23:15:11+5:302015-03-27T23:58:12+5:30
व्यवस्थापनाचा अभाव : प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची वानवा; जीवरक्षक म्हणून फायरमनची नेमणूक
सचिन भोसले - कोल्हापूर महापालिकेच्या इस्टेट विभागाकडे व्यवस्थापन असलेल्या अंबाई टँक, रमणमळा जलतरण तलाव, राजर्षी शाहू जलतरण या तिन्ही तलावांकडे तज्ज्ञ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली
नसल्याने या तलावांचा बोजवारा उडत आहे.
जलतरण तलावांसाठी किमान तीन ते चार जीवरक्षकांची गरज असते. याचबरोबर जलतरण तलावातील पाणी नियमित स्वच्छ करावे लागते. याकरिता शुद्धिकरण प्रकल्प अर्थात व्हॉल्व असलेले पंप आहेत. यासाठी पंप आॅपरेटरची आवश्यकता असते. मात्र, तिन्ही जलतरण तलावांत पाणी शुद्धिकरणासाठी कायमस्वरुपी पंप आॅपरेटर नाहीत. त्यामुळे हे काम तेथील जीवरक्षकाचे काम करणारे किंवा तेथे सुरक्षारक्षकांनाच करावे लागते.
पाणी शुद्धिकरणासाठी काही तांत्रिक बाबींसाठी योग्य प्रशिक्षणाची आवश्यकता असते; मात्र तिन्हीही जलतरण तलावात शुद्धिकरणावेळी योग्य प्रमाणात पाण्यात ब्लिचिंग पावडर वापरणे तसेच अन्य तांत्रिक बाबींचा विचार होत नाही. त्यामुळे पाण्यात कधी गाळ वरती येणे, तर कधी वाळूचे बारीक कण वर येणे असे अनेक प्रकार वारंवार होत आहेत. योग्य शुद्धिकरणाअभावी तलावात पोहायला येणाऱ्यांचे शरीर काळे पडण्याची समस्याही कायमस्वरुपी आहे. ती दूर करणे गरजेचे आहे.
याशिवाय पाणी शुद्धिकरण यंत्रणेच्या व्हॉल्वची वेळेवर दुरुस्ती होत नाही. तलावावर पोहण्यास उन्हाळी सुटीत गर्दी अधिक असते. अशावेळी मुलांवर व पोहण्यास शिकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी जीवरक्षकांची गरज भासते. एकावेळी तीन ते चार जीवरक्षकांची गरज असते. मात्र, तिन्ही जलतरण तलावांत दोन जीवरक्षक ठोक मानधनावर, तर एका अग्निशमन दलाच्या जवानाची नेमणूक फायरमन म्हणून रमणमळा तलावात केली आहे. सफाई कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्या ठिकाणी नेमणुकाच केलेल्या नाहीत. त्यामुळे सुरक्षा रक्षक किंवा जीवरक्षक म्हणून काम करणाऱ्यांना येथील साफसफाईचे काम करावे लागते.
उत्पन्न कमी, खर्च अधिक
तिन्ही तलावांमधून वर्षाला अंदाजे २० लाख रुपये तिकीट रूपातून मिळतात, तर कर्मचारी पगारावर १५ लाख रुपये, तर रंगरंगोटी, फिल्टरेशन प्लँट दुरुस्ती २० लाख रुपये असे एकूण ३५ ते ४० लाख रुपये खर्च आहे. त्याचबरोबर नव्याने रमणमळा तलाववर १५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे तिन्ही जलतरण तलाव इस्टेट विभागकडे आहेत. त्यामुळे जमेल तसा निधी उपलब्ध केला जातो असे उत्तर दिले जाते. राजर्षी शाहू जलतरण तलावाची देखभाल महापालिकेला जमत नसल्याने ४ लाख ११ हजारांची निविदा यंदाही मंजूर केली आहे. या तलावासाठी दोन कोटींहून अधिक खर्च केला आहे. वेळेवर दुरुस्ती देखभाल नसल्याने अंबाई टँक व राजर्षी शाहू जलतरण तलावाची दुरवस्थेकडे वाटचाल सुरू आहे. रमणमळा तलाव केवळ नूतनीकरण केला आहे. यामध्ये जलतरण स्पर्धेचे नियम पाळले नाहीत.
जीवरक्षकासाठी केवळ सातवी पासची अट
चांगले तलाव असूनही देखभाल वेळेवर व तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नियुक्ती होत नसल्याने या तलावांची दुरवस्थेकडे वाटचाल होत आहे. यात रमणमळा येथे नव्याने यंत्रणा बसविली आहे. जीवरक्षकांसाठी महापालिकेने केवळ सातवी पास व पट्टीचा पोहणारा एवढीच अट घातली आहे. त्यामुळे जीवरक्षक नेमणुकीत तंत्रशुद्ध प्रशिक्षणाचा अभाव दिसून येत आहे.