जल पुनर्भरण परिसंवाद कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:27 AM2021-02-16T04:27:11+5:302021-02-16T04:27:11+5:30
कसबा सांगाव : जगाच्या तुलनेत भारताची लोकसंख्या १७ टक्के अधिक आहे तर जमीन ही दोन टक्के तर वापरण्यायोग्य पाण्याची ...
कसबा सांगाव : जगाच्या तुलनेत भारताची लोकसंख्या १७ टक्के अधिक आहे तर जमीन ही दोन टक्के तर वापरण्यायोग्य पाण्याची उपलब्धता केवळ चारच टक्के आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देशात सहा हजार घनमीटर इतके पाणी प्रतिकुटुंब उपलब्ध होते. मात्र, आज पंधराशे घनमीटर इतकेच पाणी कुटुंबाच्या वाट्याला येत आहे. त्यामुळे पाणी वाचविणे आणि त्याचे पुनर्भरण करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात पुढील पिढीला पाण्यावाचून तडफडावे लागेल, असा इशारा नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक प्रभातकुमार जैन यांनी दिला.
कसबा सांगाव (ता. कागल) येथे सोमवारी जलशक्ती मंत्रालय, भारत सरकारच्या मध्यक्षेत्र नागपूरच्यावतीने आयोजित ग्रामक्षेत्र भूजल सर्वेक्षण विचारविमर्श कार्यक्रमात जैन बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रणजित कांबळे होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी जैन म्हणाले की, देशाच्या अनेक भागांमध्ये अनियमित पाऊस पडतो. त्यामुळे काही ठिकाणी अवर्षण तर काही ठिकाणी महापुराची परिस्थिती वारंवार निर्माण होते. शेतामध्ये पिकांसाठी पारंपरिक पाट पद्धतीने ७८ टक्के तर ट्रिपल, स्पिंकलरव्दारे १२ टक्के पाणी लागते. त्यामुळे ५० टक्के पाण्याची बचत होते तसेच पिकांच्या उत्पादनातही वाढ होते. अमेरिका, चीनपेक्षा भारतात पाण्याचा उपसा जास्त आहे. पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने धरणांपेक्षाही जमिनीखाली पाणी मुरवल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते.
यावेळी सरपंच रणजित कांबळे, ग्रामविकास अधिकारी एस. पी. कांबळे, बाळासो निंबाळकर यांनी पाणी बचतीबाबत मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्तविक वरिष्ठ भूजल निरीक्षक कार्तिक डोंगरे यांनी केले. सूत्रसंचालन भूजल वैज्ञानिक संदीप वाघमारे यांनी केले.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या वनिता जगताप, उज्ज्वला माळी, मेहताब मुल्ला, दयानंद स्वामी, दीपक किणे, संघर्ष महिला ग्राम संघाच्या वाघमारे, क्रांती महिला संघाच्या स्वप्नाळू उपाध्ये, शिल्पा पाटील, अंगणवाडी सेविका, मदतनीस, डी. एम. हायस्कूलचे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------------------------------------------------
फोटो कॅप्शन : कसबा सांगाव (ता. कागल) येथे ग्रामक्षेत्र भूजल पुनर्भरण कार्यक्रमात प्रादेशिक अधिकारी प्रभातकुमार जैन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.