कोल्हापूरकरांनो पाणी जपून वापरा; पाणी कपातीचे धोरण, एकदिवस आड पाणी येणार

By भारत चव्हाण | Published: October 12, 2023 04:45 PM2023-10-12T16:45:26+5:302023-10-12T16:47:14+5:30

पुरेशा पाऊस झाला नसल्याने भोगावती, पंचगंगा नदीची पातळी अचानक कमी होण्याचे प्रकार वाढले

Water reduction policy to Kolhapur, one day will provide water | कोल्हापूरकरांनो पाणी जपून वापरा; पाणी कपातीचे धोरण, एकदिवस आड पाणी येणार

कोल्हापूरकरांनो पाणी जपून वापरा; पाणी कपातीचे धोरण, एकदिवस आड पाणी येणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी पुरेशा पाऊस झाला नसल्याने भोगावती, पंचगंगा नदीची पातळी अचानक कमी होण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच फेब्रुवारीनंतर पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या गोष्टीचा विचार करुन शहर पाणी पुरवठा विभागाकडून बी, सी, डी व ई वॉर्डमधील बालिंगा योजनेवर अवलंबून असणाऱ्या भागातील नागरिकांना उद्या, शनिवार ( दि. १४ ऑक्टोंबर) पासून एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. 

सन २०२३ मध्ये नियमित पावसाच्या अभावी धरण क्षेत्रामधील पाणी साठा कमी होत असल्याने नदीपात्रामध्ये पाण्याची पाण्याची पातळी कमी होत आहे. भविष्यातील पाणी टंचाई विचारात घेता शहराला पुरेसा पाणी पुरवठा योग्य दाबाने होण्यासाठी व पाणी टंचाई परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत एक दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले. 

पाणी पुरवठ्यातील हा बदल प्रायोगिक तत्वावर असून काळम्मावाडी योजना जर दसऱ्यानंतर सुरु झाली आणि नागरिकांना पाणी व्यवस्थित मिळायला लागले की एक दिवस आड पाणी पुरवठ्याचा निर्णय रद्द करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. शहरातील नागरिकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून महापालिका पाणी पुरवठा विभागास सहकार्य करावे, असे आवाहनही सरनोबत यांनी  केले आहे. 

तर एक दिवसआड पाणी औटघटकेचा निर्णय 

कोल्हापूर शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम पूर्ण झाले असून दसरा ते दिवाळी दरम्यान या योजनेतून  शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले आहे. खरंच ही योजना मुश्रीफ यांच्या सांगण्याप्रमाणे सुरु झाली तर एक दिवस आड पाणी पुरवठ्याचा निर्णय हा औटघटकेचा ठरणार आहे. 

Web Title: Water reduction policy to Kolhapur, one day will provide water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.