राजापूर बंधाऱ्यावर पाण्याच्या नियोजनाची गरज
By admin | Published: December 6, 2015 10:11 PM2015-12-06T22:11:49+5:302015-12-07T00:24:57+5:30
बरगे बसविण्याची मागणी : कमी पावसामुळे पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न बनणार गंभीर
संदीप बावचे-- शिरोळ -यंदा दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे शिरोळ तालुक्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे आहेत. बरग्यांअभावी राजापूर बंधाऱ्यातून दररोज लाखो लिटर पाणी कर्नाटकात वाया जात आहे. आतापासूनच योग्य नियोजन साधले नाही, तर शिरोळ तालुक्याला पाणी-पाणी म्हणण्याची वेळ येणार आहे.
पावसाळ्यात पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे पुढील येणाऱ्या काळात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. दिवसेंदिवस कृष्णा नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. त्याचबरोबर शेतीस पुरवठा करणाऱ्या पाणी संस्थांचेही नियोजन कोलमडण्याची चिन्हे आहेत.
दरवर्षी कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडू लागले तर शेतकरी शेती पिकास पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी जेसीबी यंत्राच्या साहाय्याने खड्डे मारून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कसरत करतात. योग्य नियोजन न साधल्यामुळे प्रत्येक वर्षी पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसतो, ही वस्तुस्थिती आहे. सध्या कृष्णा-पंचगंगा नद्यांची पाणी पातळी खालावली आहे. पाटबंधारे विभागाने जाहीर प्रकटनाद्वारे पाणी कमी पडणार असल्याने शेतकऱ्यांना उसाऐवजी कडधान्य पीक घेण्याचे आवाहन केले आहे. नद्यांची पाणी पातळी खालावली असताना राजापूर बंधाऱ्याला बरगेच बसविले नसल्याने सध्या लाखो लिटर पाणी दररोज वाया जात आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी अडविण्यासाठी राजापूर बंधाऱ्याला तत्काळ बरगे बसविण्याची गरज आहे.
अनेक गावे अवलंबून
यंदा पाऊस कमी झाल्याने ऊस पिकाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे उत्पादनात घट येणार आहे. आगामी काळात ऊस क्षेत्राला पाणी कमी मिळणार असल्यामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे. त्यातच राजापूर बंधाऱ्यावर बरगे नसल्याने मोठ्या प्रमाणात कृष्णा नदीतून पाणी पुढे जात आहे.
येणाऱ्या उन्हाळ्यात बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या २२ हून अधिक गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच पाणीपुरवठ्याचे नियोजन करून राजापूर बंधाऱ्याला बरगे घालून पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
प्रस्ताव कागदावरच
१९८० ला बांधण्यात आलेला राजापूर बंधारा सध्या कमकुवत बनला आहे. कर्नाटकातील हिप्परगी धरणावरील स्वयंचलित दरवाजानुसार राजापूरचा बंधारा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याचा आराखडा अजूनही कागदावरच राहिला आहे. नाशिक येथील कंपनीकडे आराखडा करण्यासाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.