आजऱ्यातील ७ गावे व १३ वाफ्यांना पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:10 AM2021-05-04T04:10:44+5:302021-05-04T04:10:44+5:30

आजरा : आजरा तालुक्यातील ७ गावे व १३ वाड्यांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. कोरोनाची महामारी त्यातच पाणीटंचाई ...

Water scarcity in 7 villages and 13 wafis in Ajara | आजऱ्यातील ७ गावे व १३ वाफ्यांना पाणीटंचाईच्या झळा

आजऱ्यातील ७ गावे व १३ वाफ्यांना पाणीटंचाईच्या झळा

Next

आजरा :

आजरा तालुक्यातील ७ गावे व १३ वाड्यांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. कोरोनाची महामारी त्यातच पाणीटंचाई यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पंचायत समितीच्या वतीने एप्रिल ते जूनअखेरच्या सादर केलेल्या पाणीटंचाई आराखड्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे.

तालुक्यातील बहिरेवाडी, मुमेवाडी, पेंढारवाडी, मलिग्रे, किणे, चितळे, सोहाळे ही गावे गेली अनेक वर्षे तहानलेलीच आहेत.

सकाळी उठल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी या गावातील नागरिकांना वणवण फिरावे लागते. पारपोलीपैकी गावठाण, दाभिलपैकी दाभिलवाडी, सुळेरानपैकी माऊली हायस्कूल वसाहत, वाटंगीपैकी शाहू वसाहत, खानापूर पैकी रायवाडा, उचंगी पैकी हुडे, गवसे पैकी वास्करवाडी, चाफवडेपैकी आदर्श वसाहत, या वाड्यांना नवीन विंधन विहिरीचा प्रस्ताव आहे. तर वाटंगी मोरेवाडीपैकी धनगरवाडा येथे विहीर व विंधन विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आहे.

विंधन विहीर काढणे, विहीर अधिग्रहण करणे, नवीन पाणीपुरवठा योजना राबविणे यासाठी २१ लाख ५० हजारांचा खर्च अपेक्षित आहे. पाणी टंचाईमधून जि.प.कडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, अद्यापही त्याला मंजुरी मिळालेली नाही. तालुक्यात पावसाळ्यात दररोज १५० मि.मी. पाऊस पडतो. पण उन्हाळ्यात तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या भीषण टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

--------------------------

* कोरोनाबरोबर पाणीटंचाईची समस्या

तालुक्यातील ७ गावे व १३ वाड्यांना पाणीटंचाई जाणवत आहे. गावात असणारा कोरोना व पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पाण्यासाठी नागरिकांना शेतातील विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. पाणी आणण्यासाठीच्या ढकल गाड्यातून ८ घागरी ठेवून पाणी आणले जात आहे. सकाळची वेळ पाण्यासाठीच जात असल्याने शेतीच्या मशागतीच्या कामावर याचा परिणाम होत आहे.

--------------------

* बहिरेवाडीचा ३ कोटी ४० लाखांचा प्रस्ताव

मंत्रालयात

बहिरेवाडी गाव गेले अनेक वर्षापासून तहानलेले आहे. गावाला नदी नाही. ओढा आहे पण फेब्रुवारीतच पाणी संपते. तलाव आहे पण मार्चपासून यातील साठविलेले पाणी हिरवे होते. नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागतात. यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ३ कोटी ४० लाखांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यांच्याच प्रयत्नाने या पाणी योजनेला मंजुरी मिळून गावकऱ्यांना पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Web Title: Water scarcity in 7 villages and 13 wafis in Ajara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.