कोल्हापूर जिल्ह्यात पाणीबाणी; आता फक्त पिण्यासाठीच पाणी, शेतकरी चिंतेत
By इंदुमती सूर्यवंशी | Published: June 20, 2023 07:35 PM2023-06-20T19:35:02+5:302023-06-20T19:35:22+5:30
'किमान ७० ते ७५ मिलीमीटर पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये'
कोल्हापूर : पाऊस लांबल्याने जिल्ह्यात पाणीटंचाई सुरू झाली असून नदी, धरण व जलाशयांमधील पाणी पातळीदेखील खोल गेली आहे, त्यामुळे आता फक्त नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले असून शेतीला पाणी देता येणार नाही तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी केले तसेच शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. किमान ७० ते ७५ मिलीमीटर पाऊस होईपर्यंत पेरणी करू नका, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सध्या जिल्ह्यात पाणीटंचाई असून धरण व जलाशयांमधील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे तसेच उपसाबंदी जाहीर केली आहे. या परिस्थितीचा, संकटाचा सर्वांनी मिळून सामना करुया. शेतकऱ्यांनी किमान ७५ मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. याबाबत अधिक माहिती हवी असेल तर शंका असेल तर कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. अफवा किंवा समजुतीच्या आधारावर पेरणी करू नका, असे आवाहन त्यांनी केले.
आतापर्यंत ५ टक्के पाऊस
जिल्ह्यात सरासरी १९७१.१० मिलीमीटर पाऊस होतो पण एप्रिल व मेमध्ये वळीव न झाल्याने जमिनीच्या मशागती पूर्ण झाल्या नाहीत. जूनमध्ये ३६७.९० मिलीमीटर पाऊस होतो पण आजवर फक्त १८.० मिलीमीटर म्हणजे ५ टक्केच पाऊस झाला आहे. आधीच पेरणी केली व पुरेसा पाऊस झाला नाही तर पीक धोक्यात येऊ शकते. जिरायती क्षेत्रावरील सोयाबीन, भुईमूग या पिकांच्या पेरण्या उशिरा विलंबाने होऊ शकतात. पाण्याच्या कमतरतेमुळे ऊस पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर तसेच भाजीपाला पिके, चारा पिके यांच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात ७ टक्के पेरणी
जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरणीचे क्षेत्र १ लाख ९२ हजार ६३३ हेक्टर असून त्यात भात, नाचणी, भुईमूग व सोयाबीन या प्रमुख पिकांचा समावेश आहे. तसेच गाळप हंगामासाठी १ लाख ८८ हजार ९० हेक्टरवर ऊसाची लागवड करण्यात आली आहे. पश्चिमेकडील काही तालुक्यांमध्ये भाताची धुळपवाफ पेरणी तर शिरोळ, हातकणंगलेमध्ये उपलब्ध पाण्यावर सोयाबीन व भुईमुगाची पेरणी केली जाते. १४ जूनपर्यंत १२ हजार ५१९ हेक्टरवर म्हणजे सरासरी क्षेत्राच्या ७ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याची माहिती कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी दिली.