पाणीटंचाईप्रश्नी अधिकारी उदासीन
By admin | Published: April 23, 2016 12:01 AM2016-04-23T00:01:55+5:302016-04-23T01:01:46+5:30
भुदरगड पंचायत समिती : नागरिकांतून नाराजी व्यक्त, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
शिवाजी सावंत -- गारगोटी --गेले अनेक दिवस गटविकास अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने ग्रामसेवक गैरहजर राहत आहेत, त्याचा नाहक त्रास तालुक्यातील जनतेला होत आहे. पाणीटंचाईने अनेक गावे तहानलेली असताना एका ठिकाणीसुद्धा भेट न देण्याचे धाडस महोदयांनी केले असून, लोकप्रतिनिधी नेमके काय करीत आहेत? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
तालुक्यात एकूण २४ गावे पाणीटंचाईने ग्रासली आहेत. त्यात वरिष्ठ स्तरावरून पाहणी करून नऊ गावांतील विंधन विहिरींना पाणी लागणार नाही, असा जावई शोध लावला आहे. त्या गावातील विहिरींना पाणी आहे मग विंधन विहिरींना पाणी कसे काय लागणार नाही? असा सवाल त्या गावांतील लोकांना पडला आहे. काही ठिकाणी खासगी विहिरींमधून पाणीपुरवठा केला जातो. तालुक्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी असणारे गटविकास अधिकारी जी. आर. कांबळे यांनी मात्र एकाही ठिकाणी भेट दिलेली नाही.
१४ एप्रिलला आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार व शासनाचे सर्व विभागप्रमुख, सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत चर्चेवेळी माजी उपसभापती विश्वनाथ कुंभार यांनी प्रश्नांचा भडीमार केला होता; पण याचे समाधानकारक उत्तर देण्यास गटविकास अधिकारी कमी पडले. याबैठकीनंतर ते २0 तारखेपर्यंत कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. तालुक्यात हजर झाल्यानंतर काहीकाळ त्यानी प्रत्येक ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामसेवकांवर चांगली जरब बसविली होती; पण अलीकडे ते काही न करता केवळ काम करण्याचा दिखावा करीत आहेत, अशी कुजबुज सुरू आहे.
ग्रामसेवकांचे गोपनीय अहवाल सभेत सादर केले असल्याची चर्चा सुरू आहे. गोपनीय अहवाल सभागृहात सभेपुढे सादर करण्याचे नेमके कारण काय आहे? त्याची गोपनीयता न राखण्यात नेमका कोणता ‘अर्थ ’ दडला आहे का? यासारख्या अनेक प्रश्नांची मालिका सुरू झाली आहे. या संदर्भात तहसीलदार उज्ज्वला गाडेकर यांनी पाणीटंचाईच्या काळात कामात अक्षम्य दुर्लक्ष व कुचराई केल्याबाबत कारवाई का करू नये? अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
याबाबत माजी उपसभापती विश्वनाथ कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, गटविकास अधिकाऱ्यांचे काम अतिशय निराशाजनक असून ते कुचकामी आहेत. पाणीटंचाई बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीस ते उपस्थितीत नव्हते. यावरून त्याना सामान्य जनतेच्या अडचणीपेक्षा काय महत्त्वाचे? याबाबत लवकरच वरिष्ठांना कळविणार आहे.
यासंदर्भात गटविकास अधिकारी जी. आर. कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी कामाच्या निमित्ताने बाहेर पडलो की पदाधिकारी रिकाम्या खुर्चीचे शुटिंग करतात. कारणे दाखवा नोटीस बजावली ही घटना खरी आहे; परंतु माझ्या प्रकृती अस्वस्थतेमुळे अडचणी निर्माण होत आहेत. गोपनीय अहवालाच्याबाबतीत माहिती देताना त्यानी हात वर केले.