विंझणे, मोरेवाडी, सत्तेवाडीत पाण्याची टंचाई
By admin | Published: April 13, 2016 09:22 PM2016-04-13T21:22:37+5:302016-04-13T23:39:05+5:30
पाच दिवसांतून पाणी : नळयोजना उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
विजयकुमार कांबळे--अडकूर (ता. चंदगड) परिसरातील विंझणे, मोरेवाडी, सत्तेवाडी या गावांत गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. पाण्याने तहानलेली माणसे रानोमाळ भटकंती करत वणवण फिरत आहेत. जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याने शेतकऱ्यांनी आपली दुधाळ जनावरेही कवडीमोल दराने विकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गावा-गावांतील दूध संस्थांचे संकलनही कमी झाल्याने दूध संस्थाही बंद पडण्याची वेळ आली आहे.
विंझणे : अडकूरपासून २ कि.मी. अंतरावर डोंगराच्या कपारीत निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले विंझणे हे गाव. गावची लोकसंख्या जेमतेम १२००. या गावाला इनामदारांचे गाव म्हणूनच ओळखले जात होते. येथील १९२७ मध्ये बांधलेला ‘राम-निवास’ हा इनामदारांचा वाडा याने गावच्या वैभवात भर पडली आहे, परंतु याच गावाला पिण्याच्या पाणीटंचाईने ग्रासले आहे. गत तीन महिन्यांपासून ग्रामस्थ पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला तोंड देत आहेत. गावातील जुनी नळपाणी योजना आहे, परंतु त्या विहिरीला पुरेसे पाणी मिळत नाही. म्हणून नव्यानेच घटप्रभा नदीवरून जॅकवेल बांधून ३ कि.मी. अंतरावरून ९५ लाखांची योजना राबविली आहे. परंतु, ठेकेदार आणि वीजमंडळाच्या गलथान कारभारामुळे योजना रखडली आहे.
मोरेवाडी : विंझणे गावापासून जवळच असलेलं डोंगराच्या मध्यभागी वसलेलं मोरेवाडी हे गाव. प्रतिवर्षी शासकीय पातळीवरील लाखो रुपयांच्या पाणी योजना राबविल्या जातात, परंतु वर्षाच्या आत कोलमडतात, अशी स्थिती या गावाची आहे. नदीवरून जॅकवेल बांधून गावात पाणी आणावे अशी सूचना शासकीय अधिकारी आणि राजकीय नेतेमंडळींनी मोरेवाडीच्या गावपुढाऱ्यांना केली. मात्र, १५ टक्के निधी म्हणजेच लोकवर्गणी भरायची कुणी? शिवाय नदीवरून आणलेल्या मोटारीचे बिल कसे भरायचे? या अनेक प्रश्नांमुळे मंजूर झालेली जलस्वराज्य योजनाच ग्रामस्थांनी रद्द केली.
गावातील पाच तलावाजवळ खुदाई केलेल्या बोअरवेलला मुबलक पाणी लागले आहे, परंतु ते पाणी दूषित आहे. त्या पाण्याने अंघोळ केली तर केस चिकटतात. जनावरे तर ते पीतच नाहीत. सध्या येथील पाटील यांच्या मालकीच्या बोअरवेलचे पाणी अधिग्रहण केले आहे. हे पाणी गावच्या टाकीत सोडून २ दिवसांतून एकदा ग्रामस्थांना मिळते, तर प्रत्येकाला सहा घागर पाणी मोजून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या शिपायावर आली आहे.
सत्तेवाडी: शिरोली पैकी सत्तेवाडी या गावातही पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. शिरोलीच्या डोंगराकडून येणारे सायफनचे पाणी झरा कमी झाल्याने भीषण टंचाई जाणवू लागली आहे. घागरभर पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी महिलांसह पुरुषांना व लहान बालकांना शेती शिवारातून पायपीट करावी लागत आहे. घटप्रभा नदीवरून आणलेली नळपाणी योजना पूर्ण केली आहे. मात्र, वीजखात्याच्या काही तांत्रिक कारणामुळे ही योजना उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. जि. प.चे अडकूर विभागाचे सदस्य तात्यासाहेब देसाई यांच्या शेतातील बोअरवेलचे पाणी आता ग्रामस्थांची तहान भागवत आहे. रखडलेल्या पाणी योजना लवकर पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.