शाहूवाडीतील पाच गावांत पाणीटंचाई
By admin | Published: March 17, 2017 11:34 PM2017-03-17T23:34:36+5:302017-03-17T23:34:36+5:30
ओढ्याचे दूषित पाणी : आंबर्डे, आरूळ, करंजोशी, ओकोली व शिराळे ग्रामस्थांची भटकंती
राजाराम कांबळे --मलकापूर --शाहूवाडी तालुक्यातील आंबर्डे, आरूळ, करंजोशी, ओकोली व शिराळे या पाच गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. उन्हाची तीव्रता वाढेल तसे जनावरांनादेखील पाणी मिळत नाही. गेली पंचवीस वर्षे या गावांना पाणी-पाणी करण्याची वेळ राज्यकर्त्यांनी आणली आहे. महिलांना तर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या गावांतर्गत येणाऱ्या वाड्यांना ओढ्याचे दूषित पाणी प्यावे लागत आहे.
शाहूवाडी तालुक्यात सर्वांत जास्त पावसाचे प्रमाण आहे. मात्र, आंबार्डे, शिराळे, आरूळ, ओकोली, करंजोशी आदी गावे डोंगराच्या जवळ वसली आहेत. या गावांतून आंबर्डी नदी वाहते. मात्र, पावसाळ््यात नदीला फक्त पाणी असते. उन्हाळ््यात नदी कोरडी असते. या गावांना कायमस्वरूपी पाणी मिळण्यासाठी शासनाने योजना करणे गरजेचे आहे. आंबार्डे, आरुळ, करंजोशी या गावांना पाणी-पाणी करण्याची वेळ आली.
आंबर्डे गावात एका कूपनलिकेवर सर्व गावातील महिलांची पाण्यासाठी गर्दी होते. जनावरांना देखील नीट पाणी मिळत नाही. काम धंदा सोडून रात्रभर पाण्यासाठी कूपनलिकेवर रांगा लावाव्या लागतात. लग्न समारंभासाठी पाणी विकत घ्यावे लागते. गेली अनेक वर्षे या गावांतील नागरिक पाण्यासाठी वणवरण भटकत आहेत. करंजोशी गावाशेजारून आंबार्डी नदी जात आहे. मात्र, ही नदी कोरडी पडली आहे. फक्त पावसाळ््यात या नदीला पाणी असते. दोन महिने करंजोशी गावातील महिलांना पाणी विकत घ्यावे लागते. शिराळे गावासाठी सायफन पद्धतीची पाणी योजना आहे. उन्हाळ््यात या योजनेला अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे ओढ्यातील दूषित पाणी प्यावे लागते. शासनाने या गावासाठी मंजूर केलेली पाणी योजना वादात अडकली आहे. या गावाला गटातटाच्या राजकारणामुळे कायमस्वरूपी पाणी योजना मिळत नाही. राज्यकर्त्यांचे गावागावांत दोन गट कसे निर्माण होतील याकडे त्यांचे लक्ष असते. या गावाचा विकासदेखील खुंटला आहे. पाण्याविना हजारो एकर शेती नापीक झाली आहे. पावसाळ््यात फक्त भात पीक घेतले जाते. तरुणवर्गाला पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई-पुणे येथे जावे लागते.
या पाच गावांना कायमस्वरूपी पाणी मिळण्यासाठी आंबार्डे येथे मंजूर असणाऱ्या पाझर तलावाचे काम युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे. पाझर तलावाच्या कामात राजकारण घुसडल्याने काम थांबले आहे. आंबार्डे गावात होणारा पाझर तलाव झाला तर शाहूवाडी, करंजोशी, आरूळ, आंबर्डे, शिराळे, ओकोली, कडेवाडी गावांतील नागरिकांना कायमस्वरूपी पाण्याची सोय होणार आहे.
माजी मंत्री विनय कोरे यांच्या माध्यमातून या पाच गावांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी पाझर तलावाचे काम सुरू केले आहे.
-सर्जेराव पाटील,
जिल्हा परिषद सदस्य.