कोल्हापुरात पाणीबाणी, नागरिकांची पाण्यासाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:21 AM2021-07-25T04:21:16+5:302021-07-25T04:21:16+5:30

कोल्हापूर : अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शिंगणापूर, बालिंगा, नागदेववाडी जल उपसा केंद्रात पुराचे पाणी शिरल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा गेल्या दोन ...

Water shortage in Kolhapur, citizens rush for water | कोल्हापुरात पाणीबाणी, नागरिकांची पाण्यासाठी धावपळ

कोल्हापुरात पाणीबाणी, नागरिकांची पाण्यासाठी धावपळ

Next

कोल्हापूर : अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शिंगणापूर, बालिंगा, नागदेववाडी जल उपसा केंद्रात पुराचे पाणी शिरल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा गेल्या दोन दिवसांपासून बंद झाला. नागरिकांची पाण्यासाठी धावपळ उडाली आहे. एकीकडे महापुराचे पाणी असताना शहरात मात्र नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

महापालिकेच्यावतीने शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ५९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. यापैकी शनिवारी २९ टँकरद्वारे शहराला पाणीपुरवठा करण्यात आला. उर्वरित ३० टँकर रात्रीपर्यंत कोल्हापुरात दाखल होतील, असे सांगण्यात आले. सातारा, सांगली, सोलापूर येथून येणारे टँकर हायवेला पुराच्या पाण्यामुळे अडकलेले आहेत. महापालिकेचे १० हजार लिटर क्षमतेचे ८ टँकर असून सांगली येथून शुक्रवारी १२ हजार लिटरचे १३ टँकर दाखल झाले आहेत. शहरातील खासगी २४ हजार लिटरचे ८ टँकर महापालिकेने भाड्याने घेतले आहेत.

प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सर्व टँकरचे प्रभागनिहाय नियोजन करून पाणी वाटप करण्याच्या सूचना जलअभियंता अजय साळोखे यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर टँकर भरल्यानंतर कोणत्या प्रभागात पाणीपुरवठा केला जाणार याची माहिती, प्रभागाचा नंबर टँकरवर लावावा. पाणी भरताना गोंधळ व गर्दी होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दुपारी बावडा जलशुद्धिकरणवस केंद्रास भेट दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त रवींद्र आडसुळ, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता उपस्थित होते.

कळंबा जलशुद्धिकरण केंद्रातून एक दिवस आड पाणीपुरवठा

कळंबा जलशुद्धिकरण केंद्रातून शिवाजी पेठ व मंगळवारपेठ येथील काही भागांना कळंबा तलावातून पाणीपुरवठा होतो. यामध्ये संभाजीनगर, शहाजी वसाहत, सुधाकर जोशी नगर, नाळे कॉलनी, संभाजीनगर स्टॅन्ड परिसर, हनुमाननगर, हॉकी स्टेडियम, म्हाडा कॉलनी, वारे वसाहत, गवत मंडई, काळकाई गल्ली, वेताळमाळ तालीम, खरी कॉर्नर, नंगीवली चौक, मिरजकर तिकटी डावी बाजू, लाड चौक, भारत डेअरी या परिसराचा समावेश आहे. या सर्व भागांना पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

Web Title: Water shortage in Kolhapur, citizens rush for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.