राधानगरी धरणातील पाणी सोडण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 02:54 PM2020-05-22T14:54:43+5:302020-05-22T14:55:03+5:30
पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर राधानगरी धरणातील पाणीसाठा कमी होण्यासाठी कालपासून धरणाच्या मुख्य दरवाजातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. धरणात सद्या ०२:२३ टिएमसी पाणीसाठा आहे. पावसाला सुरुवात होईपर्यंत मागणीनुसार ह्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
राधानगरी : पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर राधानगरी धरणातील पाणीसाठा कमी होण्यासाठी कालपासून धरणाच्या मुख्य दरवाजातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. धरणात सद्या ०२:२३ टिएमसी पाणीसाठा आहे. पावसाला सुरुवात होईपर्यंत मागणीनुसार ह्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
गतवर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने महापुराच्या संकटाला सामोरे जावे लागले होते. धरणातील शिल्लक पाणीसाठा, मोठ्या पाणलोट परिसरामुळे लवकर भरणारे धरण व पावसाचा उच्चांक या कारणामुळे ऑगस्ट महिन्यात महापुराचा कहर झाला होता.
उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे यावर्षी धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिला आहे. साडेआठ टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या या धरणात एप्रिलच्या सुरुवातीला ४.६५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.
दोन महिन्यात सुरु असलेल्या लॉक डाऊन मुळे सर्व औद्योगिक व अन्य कारखाने बंद आहेत. त्यामुळे केवळ शेती आणि पिण्यासाठीच पाण्याचा वापर सुरु आहे. परिणामी पाण्याचा वापर कमी होता.
येथील पाण्याचा विसर्ग जल विद्युतनिर्मिती केंद्राद्वारे केला जातो. गेल्या दीड महिन्यात यातून अडीच टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे उन्हाळ्यातही भोगावती नदी दुथडी भरून वाहत आहे.
बुधवारी धरणातील पाणीसाठा दोन ०२:२३ टीएमसी व पाणी पातळी २९६ फुटावर आली. या पातळीवर जलविद्युत निर्मिती केंद्राचा पाणी पुरवठा बंद होतो. त्यामुळे धरणाच्या मुख्य दरवाजातून प्रतिसेकंद ९०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
सध्या मुख्य दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उपलब्ध असलेला पाणीसाठा व कोल्हापूर, इचलकरंजी येथील गरज व मागणी पाहून हा विसर्ग करण्यात येईल. पावसाचा अंदाज पाहूनच धरण रिकामे करण्याबाबत निर्णय येणार आहे.
विवेक सुतार,
शाखा अभियंता,राधानगरी