१५ जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

By admin | Published: April 15, 2016 12:10 AM2016-04-15T00:10:54+5:302016-04-15T00:35:14+5:30

जिल्ह्यातील स्थिती : चंद्रकांतदादांची माहिती; आकडे टाकणाऱ्यांवर कारवाई; पाणी बचतीच्या नियोजनाला सहकार्याचे आवाहन

Water storage needed till June 15 | १५ जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

१५ जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

Next

कोल्हापूर : जिल्ह्यात १५ जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. प्रशासनाने उपसाबंदी व केलेल्या अन्य नियोजनाची अंमलबजावणी काटेकोर करण्यासाठी सर्वच घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे. उपसाबंदी वेळी आकडे टाकून विद्युतपंपाद्वारे पाणी उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासंबंधीचा आढावा रोज जिल्हाधिकारी घेतील, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी सांगितले.
पाणीटंचाई निवारण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, पाणीटंचाई निवारण्यासाठी केलेले उपाय, शिल्लक असलेला पाणीसाठा, शेती, औद्योगिक, पिणे यासाठी आवश्यक पाणी किती आहे, याचा सविस्तर आढावा घेतला. उपसाबंदी असताना आकडा टाकून विद्युतपंपाद्वारे पाणी उपसल्यास नियोजन बिघडणार आहे. त्यामुळे आकडा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई होईल. पाणी बचतीसाठी सर्वच घटकांनी सहकार्याची भूमिका घेणे गरजेचे आहे.
सध्या जिल्ह्यातील ११३ गावे टंचाई म्हणून घोषित केली आहेत. गडहिंग्लज, चंदगड, कागल, हातकणंगले, भुदरगड, आजरा या तालुक्यांतील टंचाईग्रस्त गावात २८ विंधन विहिरींची खुदाई करण्यास मंजुरी दिली आहे. टंचाईग्रस्त गावात मागणी आल्यानंतर प्रशासन खात्री करून त्वरित विंधन विहिरींची खुदाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. इचलकरंजी, कागल, मुरगूड या शहरांत पाणीटंचाई निर्माण होईल, अशी माहिती होती; परंतु जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाचा विचार केल्यास मुरगूड, कागल शहराला पाणी टंचाई भासणार नाही. इचलकरंजीत नीट पाणी नियोजन करण्याची सूचना नगरपालिकेस दिली आहे. सूचना पाळण्यास व सदोष वितरण व्यवस्था राबविल्यास इचलकरंजीतही पाणी टंचाई निर्माण होणार नाही. कळंबा तलावातील गाळ काढण्याचेही काम सुरू आहे. काम दर्जेदार व्हावे, यासाठी त्रयस्त यंत्रणेकडून तपासणी केली जात आहे. राज्यातील अधर्वट राहिलेले पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन शासनाने केले आहे.

२५ टक्के : पाणी कपात
केवळ शेतीच्या पाणी उपशावरच निर्बंध आणलेले नाहीत, तर औद्योगिक वापरासाठीच्या एकूण मागणीतील २५ टक्के पाणी कपात केली आहे. स्वत:हूनच उद्योजकांनीही कपात करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली. पोलिस बंदोबस्तात कोठेही पाणी देण्याची परिस्थिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
...तर कारखान्यांवर कारवाई
मंत्री पाटील म्हणाले, ऊस संपल्यामुळे बहुतांश जिल्ह्यांतील साखर कारखाने बंद झाले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना लागणारे पाणी वाचले आहे; परंतु कारखाने बंद झाल्यानंतर मळी मिश्रित व अन्य दूषित पाणी पंचगंगा नदीत सोडल्यास प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे दूषित पाणी सोडू नये, यावर नजर ठेवा. सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी, अशी कडक सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.
कोल्हापुरातील गळतीसंबंधी बैठक
सर्वत्र पाणी टंचाई आहे; मात्र कोल्हापूर शहरात अनेक दिवसांपासूनची गळती कायम आहे. पाणी वाया जात आहे याकडे लक्ष वेधल्यानंतर मंत्री पाटील म्हणाले, शहरातील गळती काढण्यासाठी महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत स्वतंत्र बैठक बोलावण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांना दिली.

Web Title: Water storage needed till June 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.