बस्तवाडला दूषित पाणीपुरवठा
By admin | Published: November 6, 2014 12:35 AM2014-11-06T00:35:41+5:302014-11-06T00:38:42+5:30
पन्नासजणांंना साथीचे आजार : टँकरने पाणीपुरवठा सुरू; आरोग्य यंत्रणा खडबडून जागी
कुरुंदवाड : कृष्णा नदीत मळीयुक्त दूषित पाणी आल्यामुळे बस्तवाड (ता. शिरोळ) येथील नागरिकांना उलट्या व जुलाब होत असून, पन्नासहून अधिक लोकांना या साथीच्या आजारांची लागण झाली आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून, नदी दूषित करणाऱ्यांची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे. दूषित पाण्यामुळे नदी उशाला असूनही ग्रामस्थांना टॅँकरच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या साथीच्या आजारांमुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, तालुका वैद्यकीय अधिकारी पी. एस. दातार यांच्या नेतृत्वाखाली आठ डॉक्टरांचे पथक कार्यरत झाले आहे. दरम्यान, दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाल्याने आमदार उल्हास पाटील, जि. प. आरोग्य सभापती सीमा पाटील यांनी गावाला भेट देऊन रुग्णांची चौकशी केली.
कृष्णा नदीकाठावर असलेल्या बस्तवाड गावाला या नदीतून पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. गावाला फिल्टर योजना नसल्याने टीसीएल (पाणी शुद्धिकरण पावडर) वापरून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या दोन दिवसांपासून नदीला काळेकुट्ट व दुर्गंधी सुटणारे मळीयुक्त पाणी आल्याने व ते पाणी गावात पुरवठा केल्याने नागरिकांना उलट्यांचा त्रास जाणवू लागला. सरपंच शमाबानू जमादार, उपसरपंच जे. डी. चव्हाण यांनी आरोग्य विभागाला कळविल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली.
आज, बुधवारी सकाळी पंचायत समिती तालुका वैद्यकीय अधिकारी पी. एस. दातार यांच्या नेतृत्वाखाली व टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एम. ए. ऐनापुरे यांच्यासह आठ डॉक्टरांच्या पथकाने तपासणी व उपचार मोहीम सुरू केली. अचानक उद्भवलेल्या साथीच्या आजारांमुळे नागरिकांतून भीती व्यक्त होत असून, ग्रामस्थांना पिण्यासाठी दत्त साखर कारखान्याच्या अग्निशमन विभागाकडून टॅँकरने पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
ग्रामस्थांची झुंबड उडाली असून, नदी उशाला व तुडुंब भरलेली असतानाही पाण्याच्या टॅँकरची वाट पाहावी लागत आहे, हे दुर्दैव आहे.गावामध्ये आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे समजताच आ. उल्हास पाटील यांनी गावाला भेट देऊन नदीतील पाण्याची पाहणी करून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. तसेच जि. प. आरोग्य सभापती सीमा पाटील, स्वाभिमानी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील, विजय पाटील यांनी नदीतील प्रदूषित पाणी घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
गावाला टँकरने शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी इरफान जमादार, जे. डी. चव्हाण, जाफर पटेल, महावीर मगदूम, आसिफ पटेल, दिलावर पटेल, आदी प्रयत्न करीत आहेत, तर गावातील तरुण कार्यकर्त्यांनी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीची श्रमदानातून स्वच्छता केली. (प्रतिनिधी)
कृष्णा नदीत अचानक आलेल्या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे उपसरपंच जे. डी. चव्हाण म्हणाले. ते म्हणाले, त्यामुळे गावाची पिण्याची नळ पाणीपुरवठा व्यवस्था तात्पुरती बंद ठेवली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था केली असून, नागरिकांनी पिण्यासाठी याच पाण्याचा वापर करावा. नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांची चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी.