शहरात तांत्रिक कारणांमुळे पाणी पुरवठा बंद, नागरीक हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 02:33 PM2020-06-02T14:33:04+5:302020-06-02T14:38:22+5:30
कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भोगावती नदीवरील बालिंगा व नागदेववाडी येथील उपसा केंद्राकडील ट्रान्स्फॉर्मर जळाल्यामुळे मंगळवारी दिवसभर शहरात पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला. धरणात सरासरीपेक्षा अधिक जलसाठा असताना, नदी काठोकाठ भरुन वाहत असताना केवळ तांत्रिक कारणांमुळे पाणी पुरवठा बंद पडल्यामुळे विशेषत: महिला वर्गाची बरीच गैरसोय झाली.
कोल्हापूर : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भोगावती नदीवरील बालिंगा व नागदेववाडी येथील उपसा केंद्राकडील ट्रान्स्फॉर्मर जळाल्यामुळे मंगळवारी दिवसभर शहरात पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला. धरणात सरासरीपेक्षा अधिक जलसाठा असताना, नदी काठोकाठ भरुन वाहत असताना केवळ तांत्रिक कारणांमुळे पाणी पुरवठा बंद पडल्यामुळे विशेषत: महिला वर्गाची बरीच गैरसोय झाली.
गेल्या दोन दिवसापासून शहरातील काही विशिष्ट भागात अपूरा, कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी असतानाच सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक भोगावती नदीवर असलेल्या बालिंगा व नागदेववाडी येथील उपसा केंद्रातील ट्रान्स्फॉर्मर जळाले.
एकाच वेळी दोन ट्रान्स्फॉर्मर जळल्यामुळे बालिंगा जलशुध्दीकरण केंद्राचे काम बंद पडले. बालिंगा जलशुध्दीकण केंद्रातून चंबुखडी पाण्याची टाकी भरली की पहाटे दोन वाजल्यापासून शहराच्या चार वॉर्डांना पाणी पुरवठा सुरु केला जातो. परंतु रात्री साडेबारा वाजताच ट्रान्स्फॉर्मर जळल्यामुळे बालिंगा जलशुध्दीकरण केंद्र बंद पडले. परिणामी शहरातील पाणी पुरवठा बंद झाला.
शहरातील ए, बी, सी व डी या भागासह उपनगरातील नागरीकांची त्यामुळे मोठी गैरसोय झाली. सानेगुरुजी वसाहतीपासून गंगावेश, शिवाजी पूल तसेच दुधाळीपासून उमा टॉकीजपर्यंतच्या सर्वच भागात पाणी मिळाले नाही.
ट्रान्स्फॉर्मर दुरुस्तीचे काम पहाटे साडेपाच वाजल्यापासून हाती घेण्यात आले. परंतु हे काम सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरु होते. दुपारी एक वाजता नागदेववाडी उपसा केंद्राचा एक पंप तर बालिंगा जलशुध्दीकरण केंद्राकडील एक उपसा पंप सुरु करण्यात पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना यश आले, परंतू मागणीपेक्षा पुरवठ्याचे प्रमाण अगदीच नगण्य होते. मंगळवारी दिवसभर शहरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवली. बुधवारीही कमी दाबाने तसेच अपूरा पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.