पाटबंधारेच्या कारवाईमुळे सील केलेला कृष्णा योजनेचा पाणीपुरवठा सुरू, २२ तास उपसा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 01:36 PM2024-03-23T13:36:47+5:302024-03-23T13:37:07+5:30
इचलकरंजीचे प्रशासन खडबडून जागे
इचलकरंजी : सांगलीच्या पाटबंधारे विभागाने इचलकरंजी महापालिकेचे मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील पाणी उपसा केंद्र १४ कोटी रुपयांच्या थकबाकीवरून सील केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे तातडीचे पत्र जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पाठविण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी अडीच वाजता सील काढण्यात आले व पाणीपुरवठा सुरू झाला.
शहराला कृष्णा नदीवरील मजरेवाडी उपसा केंद्रातून ४५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. या उपशापोटी १४ कोटी ६० लाख ५९ हजार ८३३ रुपयांची मागणी सांगली पाटबंधारे विभागाने महापालिकेला केली आहे. मात्र, अकरा कोटी इतकीच रक्कम देणे असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. त्यापैकी ७ कोटी २५ लाख रुपये महापालिकेने पाटबंधारे विभागाला भरले आहेत. तसेच १ कोटी ४१ लाख रुपयांची बॅँक गॅरंटीही पाटबंधारेकडे आहे.
असे असताना कोणतीही नोटीस न देता गुरुवारी (दि.२१) सायंकाळी साडेपाच वाजता नृसिंहवाडी विभागाचे शाखाधिकारी आर.सी. दानोळे यांनी मजरेवाडी येथील उपसा केंद्रातील पॅनल बोर्ड, विद्युत संच व मीटरला सील ठोकले. सील तोडल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा येऊन पाहणीही केली.
पाटबंधारे खात्याचे उपअभियंता यांनी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची २० मार्चला भेट घेतली होती. महापालिकेची घरफाळा वसुली सुरू असून, शेवटच्या आठवड्यात जास्तीत जास्त रक्कम भरण्यात येईल, असे सांगितले होते. तरीही पाटबंधारे विभागाने धडक कारवाई केल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्यापोटी शुक्रवारी २८ लाख ३१ हजार ५५८ रुपयांचा धनादेश पाटबंधारे विभागाला पाठविण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारनंतर पाणीपुरवठा सुरू झाला. तब्बल २२ तास शहराचा पाणीपुरवठा बंद राहिला होता.
महापालिकेने भरली इतकी रक्कम
- मार्च २०२२ - ७० लाख
- नोव्हेंबर-डिसेंबर २०२२ - १ कोटी
- १ मार्च २०२३ - चार कोटी २४ लाख ५० हजार
- मार्च २०२३ - सोळा लाख ४३ हजार ४९७
- नोव्हेंबर २०२३ - ७५ लाख ४८ हजार व नऊ लाख ९८ हजार.
- मार्च २०२४ - २८ लाख ३१ हजार ५५८.
कारवाई संयुक्तिक नाही : दिवटे
- केवळ सुमारे तीन कोटींच्या दरम्यान सेस रक्कम भरणे शिल्लक असून, त्यापोटी शहराचे पाणी थेट बंद करण्याची पाटबंधारे विभागाची कृती संयुक्तिक नाही.
- पंचगंगा नदीतून पाणी उपसा बंद आहे. सध्या कृष्णा नदीवरूनच पाणीपुरवठा सुरू आहे. पाटबंधारे विभागाने पाणीपुरवठा खंडित केल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद आहे.
- सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असून, पाणीपुरवठा तत्काळ पूर्ववत न केल्यास नागरिकांकडून उद्रेक होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.