बानगेकरांना सौरऊर्जेवर पाणीपुरवठा

By admin | Published: May 9, 2017 12:32 AM2017-05-09T00:32:03+5:302017-05-09T00:32:03+5:30

जिल्ह्यातील पथदर्शी प्रयोग : चाचणी यशस्वी; काळाचीगरज ओळखून पाऊल

Water supply to Solanki on Solar Energy | बानगेकरांना सौरऊर्जेवर पाणीपुरवठा

बानगेकरांना सौरऊर्जेवर पाणीपुरवठा

Next


दत्ता पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हाकवे : गावकऱ्यांना पिण्याचे पाणी सातत्याने देता यावे, वीज बिलाचीही बचत व्हावी या उदात्त हेतूने बानगे (ता. कागल) येथील ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी योजनेच्या उपशासाठी सौरऊर्जा पंपाचा आधार घेतला आहे. सुमारे नऊ लाख रुपये खर्चून हा प्रकल्प केवळ चार महिन्यांत कार्यान्वित करून एक धाडसी निर्णय घेतला आहे. गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सौरऊर्जेचा हा जिल्ह्यातील पथदर्शी प्रयोग असून, इतर गावांनाही अनुकरणीय मानला जात आहे.
शासनाने १४व्या वित्त आयोगातील निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करीत संबंधित गावच्या सार्वजनिक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी हा निधी वापरण्याची मुभाही दिली आहे. बहुतांश गावांनी हा निधी रस्ते, गटारी, स्वच्छतेवर खर्च केला आहे. मात्र, बानगे ग्रामपंचायतीने भविष्याचा वेध घेत सौरऊर्जेचा वापर ही काळाची गरज ओळखून हे अग्निदिव्य पार करण्याचा चंग बांधला.
अनेक ग्रामपंचायतीचे वीज बिल हे प्रतिमहिना ५० हजारांपासून लाखाच्या घरात जाते. त्यामुळे १० लाखांपर्यंत वीज बिल बाकी असणारी जिल्ह्यात अनेक गावे आहेत. परिणामी वीज वितरण कंपनीला वीज बिल थकीत असणाऱ्या ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन खंडित करावे लागते. त्यामुळे अनेकवेळा ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते.


सौरऊर्जेवर गावाला पाणीपुरवठा हे स्वप्नवत वाटणारा पथदर्शी प्रयोग प्रत्यक्षात आणला आहे. यासाठी सर्व अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचे योगदान लाभले. या प्रयोगाची चाचणी यशस्वी झाली असून, नदीवरून अडीच कि़ मी. अंतरावर असणाऱ्या उंच टाकीत पाणी पोहोचले आहे. यामुळे आमचा विश्वास दृढ झाला असून, भविष्यात ३० एचपीचा परवाना घेऊन संपूर्ण पाणीपुरवठा सौरऊर्जेवरच करण्याचा मनोदय आहे. - वंदना सावंत, सरपंच बानगे


ही परिस्थिती आपल्या ग्रामस्थांना येऊ नये यासाठी बानगे ग्रामपंचायतीने सौरऊर्जेवर विद्युत पुरवठा करून पाणीपुरवठा करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. कॉ. जीवनराव सावंत, कॉ. इंदुमती सावंत, कॉ. वसंतराव सावंत यांच्यापासून चळवळीची ऊर्जा घेतलेल्या बानगेकरांमध्ये क्रांतिकारी निर्णयाची परंपरा कायम आहे. कुस्तीपंढरी म्हणून नावलौकिक असणाऱ्या या गावाने पाणीपुरवठ्यासाठी सौरऊर्जेचा राबविलेला प्रकल्पही कौतुकास्पद आहे.
यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शिंदे, परवडी तसेच कागलचे गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, अभियंता कोळी यांच्यासह ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा अभिनव प्रकल्प उभारणे शक्य झाले. यासाठी सरपंच वंदना रमेश सावंत, उपसरपंच बाळासाहेब सावंत, ग्रामसेवक दत्तात्रय ढेरे व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Water supply to Solanki on Solar Energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.