Kolhapur: आठ दिवस पाणीपुरवठा ठप्प, संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना कोंडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:35 IST2025-04-22T15:34:50+5:302025-04-22T15:35:14+5:30
कुरुंदवाड : पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे पंचगंगा नदीपात्रातील पाणीपातळी कमी झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून शेतीचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ...

Kolhapur: आठ दिवस पाणीपुरवठा ठप्प, संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना कोंडले
कुरुंदवाड : पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे पंचगंगा नदीपात्रातील पाणीपातळी कमी झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून शेतीचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. पाण्याअभावी पिके वाळत असल्याने शिरढोण (ता. शिरोळ) येथील शेतकऱ्यांनी कुरुंदवाड पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांना कोंडून घातले.
पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी शशांक शिंदे आल्यानंतर व बुधवारपर्यंत पंचगंगा नदीपात्रातील पाणीपातळी ३० फूट करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर अधिकाऱ्यांची सुटका केली. जयहिंद सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष दस्तगीर बाणदार यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
दरम्यान, बुधवारपर्यंत पाणीपातळी योग्य न झाल्यास पाटबंधारे अधिकाऱ्यांना पुन्हा कोंडून कार्यालयासमोरच आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. तेरवाड बंधाऱ्यावर पंचगंगा पाणीपातळी २७ फुटांच्या खाली गेल्याने या नदीवरील खासगी व सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे विद्युतपंप उघडे पडले आहेत. कार्यालयाकडे वारंवार तक्रार करूनही अधिकारी निष्काळजीपणा करत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी पाटबंधारे शाखा कार्यालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक सुमित डोंगळे, कार्यालयीन लिपिक एस. जी. शिंदे यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने शेतकऱ्यांनी कार्यालयाला कडी घालून अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कोंडले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दुपारी येथील पाटबंधारे कार्यालयातील उपविभागीय अधिकारी शशांक शिंदे आल्याने बाणदार यांच्यासह शेतकऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत धारेवर धरले. सुमारे एक तासांच्या वादळी चर्चेनंतर अधिकारी शिंदे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर पाटबंधारे कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुटका केली.
आंदोलनात सरपंच भास्कर कुंभार, अरुण शिंगे, डॉ. संदीप नागणे, अर्जुन बेबडे, शाहीर बाणदार, मोरा भंडारे, सुधाकर खोत, उत्तम शिंदे, भाऊसाहेब चौधरी, अस्लम मुजावर यांच्यासह शिरढोण, अब्दुललाट येथील शेतकरी सहभागी झाले होते.