इचलकरंजीत पाणीपुरवठ्याचे व्हॉल्व्ह बनले धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:16 AM2021-07-05T04:16:31+5:302021-07-05T04:16:31+5:30
इचलकरंजी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे अनेक व्हॉल्व्ह धोकादायक स्थितीत आहेत. हे व्हॉल्व्ह रस्त्याच्या मधोमध असल्याने पादचारी व ...
इचलकरंजी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे अनेक व्हॉल्व्ह धोकादायक स्थितीत आहेत. हे व्हॉल्व्ह रस्त्याच्या मधोमध असल्याने पादचारी व वाहनचालकांना याचा खूपच अडथळा होत आहे. व्हॉल्व्हला ठेच लागून अनेक नागरिक जखमी होत असून, वाहनचालकांचेही मोठे नुकसान झाले आहे. व्हॉल्व्हच्या बाजूने मोठा खड्डा निर्माण झाल्याने ते धोकादायक बनत आहेत. त्यामुळे त्वरित यावर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
शहरातील प्रांत कार्यालयाजवळ, श्रीमंत घोरपडे नाट्यगृह, पंचवटी चित्रमंदिर, राजाराम स्टेडियम, नगरपालिका आदी ठिकाणी पाणी साठ्याकरिता नगरपालिकेने जलकुंभे उभारली आहेत. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी पालिकेने सबपंप योजना कार्यान्वित केली आहे. भूमिगत पाईपलाइनद्वारे जलकुंभातून पाणी साठवण्यात येते. पाण्याची विभागणी सम प्रमाणात होण्यासाठी अनेक ठिकाणी व्हॉल्व्ह बसवण्यात आले आहेत; मात्र हे व्हॉल्व्ह रस्त्याच्या मधोमधच जवळपास अर्धा फूट उंचीवर आल्याने नागरिक व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीमुळे दिवसेंदिवस व्हॉल्व्हच्या बाजूचा खड्डा वाढतच असल्याने आणखी धोका निर्माण होत आहे.
शहरातील प्रांत कार्यालय चौकात व गुजरी पेठ कॉर्नरजवळ रस्त्यात मधोमध व्हॉल्व्ह असल्याने अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे प्रांत कार्यालय चौकातील व्हॉल्व्हला बॅरिकेड्स लावण्यात आले आहे. या व्हॉल्व्हचा वाहनांना अडथळा होत असल्याने मोटारींचे गेअरबॉक्स व पेट्रोल टाक्या फुटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही परिसरातील व्हॉल्व्हमधून पाण्याची गळती होत असून, पाणीही वाया जात आहे. हे व्हॉल्व्ह नियमानुसार जमीन लेव्हलला असणे गरजेचे आहे ; पण ते अर्धा फूट वर दिसून येत आहेत. अंधार पडल्यावर तर ते अजिबात दिसून येत नाहीत या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना याचा खूप त्रास होत आहे.
चौकट
प्रशासनाला जाग कधी येणार ?
शहरातील प्रांत कार्यालय चौकातील व गुजरी पेठ कॉर्नरजवळील व्हॉल्व्ह अनेक दिवसांपासून धोकादायक परिस्थितीत आहेत. शहरातील प्रमुख मार्ग असून, दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते; मात्र नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे एखादा मोठा प्रसंग घडल्यानंतर नगरपालिका प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
फोटो ओळी
०४०७२०२१-आयसीएच-०२
प्रांत कार्यालय चौकात मध्यभागी व्हॉल्व्हचा खड्डा दुरुस्त करण्यासाठी बॅरिकेड्स लावून ठेवले आहेत.