कुकुडवाडीत पाणीपुरवठा करणारी विहीर कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:17 AM2021-06-17T04:17:05+5:302021-06-17T04:17:05+5:30
तारळे खुर्द-कुकुडवाडी (ता. राधानगरी) ग्रुपग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कुकुडवाडी गावातील नागरिकांना पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी १९८८ ला या विहिरीचे सिमेंट काँक्रीटसह ...
तारळे खुर्द-कुकुडवाडी (ता. राधानगरी) ग्रुपग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कुकुडवाडी गावातील नागरिकांना पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी १९८८ ला या विहिरीचे सिमेंट काँक्रीटसह दगडी बांधकाम करण्यात आले होते. पाचशे लोकवस्ती असणाऱ्या या गावातील नागरिकांसाठी दोन मोटर पंपाच्या साहाय्याने सकाळ-संध्याकाळ पाणीपुरवठा सुरू होता.
दरम्यान, मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे पूर्ण क्षमतेने पाणी भरलेली विहीर कोसळली. या वेळी पाणीउपसा करण्यासाठी बसविलेले दोन मोटर पंप व लोखंडी बारही विहिरीत गाडले गेले. विहिरीला लागूनच शेताकडे जाणारा मुख्य रस्ता आता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. पाणीपुरवठा करणारी विहीर कोसळल्याने ग्रामस्थांना होणारा पाणीपुरवठा आता खंडित होणार आहे. परिणामी ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागणार आहे. संबंधित विभागाने पर्यायी व्यवस्था करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
पंचायत समितीचे पाणीपुरवठा उपअभियंता कराड, शाखा अभियंता लोहार, गवळी, तलाठी संभाजी शिंदे, ग्रामसेवक नंदिनी नाईकनवरे, सरपंच आनंदा पाटील, नाथा पाटील, सदाशिव ढवण, राजू डवरी, वीज वितरणचे सुरेश डवर, सुरेश पाटील आदींसह बी. जी. डवरी, दिलीप विटेकर, तानाजी मगदूम, बळवंत पाटील, बाबूराव विटेकर, दत्तात्रय पौडंकर यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.
कुकुडवाडी येथे गावाला पाणीपुरवठा करणारी कोसळलेली विहीर.
छायाचित्र / रमेश साबळे