पाणीपुरवठा सुरळीत होण्यास शनिवार उजाडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:26 AM2021-07-29T04:26:04+5:302021-07-29T04:26:04+5:30
कोल्हापूर : शिंगणापूर व नागदेववाडी येथील उपसा केंद्रात काम करताना महापुराच्या पाण्यामुळे अडथळे येत असल्याने शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास ...
कोल्हापूर : शिंगणापूर व नागदेववाडी येथील उपसा केंद्रात काम करताना महापुराच्या पाण्यामुळे अडथळे येत असल्याने शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास शनिवारचा दिवस उजाडणार आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी उपसा केंद्रे सुरू करण्याचे अविरत प्रयत्न करत असले तरी त्यांना या अडथळ्यांचाही सामना करावा लागत आहे.
बालिंगा उसपा केंद्र सुरू करण्यात कर्मचारी व अधिकाऱ्यांना यश आले असले तरी नागदेववाडी व शिंगणापूर उपसा केंद्रातील कामे करता आलेली नाहीत. नागदेववाडी उपसा केंद्रातील मोटारी पुन्हा जोडण्यात आल्या आहेत. परंतु विद्युत पॅनेल जोडण्यात अडचणी आल्या आहेत.
पाण्यात जाऊन कर्मचाऱ्यांनी शिंगणापूर केंद्रातील मोटारी खोलल्या आहेत. मात्र पुराच्या पाण्यातून त्या बाहेर आणणे शक्य झालेले नाही. वाहनास रस्ता नसल्यामुळे पाण्याची पातळी आणखी कमी होण्याची प्रतिक्षा करावी लागत आहे. आज, गुरुवारी रस्ता मोकळा झाला तर त्या बाहेर काढल्या जाणे शक्य आहे. त्यानंतर दोन दिवस त्यांच्या दुरुस्तीला लागतील. त्यामुळे शनिवारपर्यंत तरी पाणीपुरवठा सुरळीत होणे शक्य नाही.