पाणी पुरवठा आजपासून पूर्ववत होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:17 AM2021-06-25T04:17:45+5:302021-06-25T04:17:45+5:30
कोल्हापूर : शिंगणापूर अशुद्ध उपसा केंद्राकडून पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी पुरवठा करणाऱ्या पंपामधील बिघाड दुरुस्त करण्यात अखेर महानगरपालिका पाणी ...
कोल्हापूर : शिंगणापूर अशुद्ध उपसा केंद्राकडून पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी पुरवठा करणाऱ्या पंपामधील बिघाड दुरुस्त करण्यात अखेर महानगरपालिका पाणी पुरवठा विभागास यश आले असून आज, शुक्रवारपासून संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा नियमितपणे सुरू होणार आहे.
शिंगणापूर अशुद्ध उपसा केंद्राकडून पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी पुरवठा करणाऱ्या चार पंपापैकी दोन पंप दि.१६ जून रोजी बंद पडले होते. त्यापैकी एक पंप दुसऱ्या दिवशीच म्हणजे दि.१७ जून रोजी दुरुस्त करून सुरू करण्यात आला होता. या तीन पंपाद्वारे पाणी उपसा करूनही शहरातील काही भागातील नागरिकांना अपुरा, कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता तर काही भागात पाणी पुरवठा होत नव्हता.
त्यामुळे दि.१८ जूनपासून पाणी पुरवठा विभागामार्फत एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन करुन पुरेशा दाबाने पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला होता. या नियोजना प्रमाणे शहरातील ए, बी आणि ई वॉर्डात एक दिवस आड उपलब्ध होणारे पाणी घेऊन नागरिकांनी सहकार्य केले.
ऐन पावसाळ्यात एक महिन्यात तीन वेळा शहरात यांत्रिक बिघाडामुळे शहरातील पाणी पुरवठ्यात व्यत्यय आला होता. तरीही नागरिकांनी संयम राखत प्रशासनास सहकार्य केले.