आंबेओहोळ धरणग्रस्तांचे जलसमर्पण आंदोलन तात्पुरते स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:28 AM2021-08-14T04:28:22+5:302021-08-14T04:28:22+5:30
आजरा तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मंगळवारी (१७) गडहिंग्लज प्रांत कार्यालयात बैठक घेणार असल्याचे लेखी पत्र दिल्याने आंबेओहोळ धरणग्रस्तांना ...
आजरा तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मंगळवारी (१७) गडहिंग्लज प्रांत कार्यालयात बैठक घेणार असल्याचे लेखी पत्र दिल्याने आंबेओहोळ धरणग्रस्तांना जलसमर्पण आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
मंगळवारच्या बैठकीत काय निर्णय होतात यावर पुढील दिशा ठरवली जाईल, अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांनी दिली.
आंबेओहोळ धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात मार्च महिन्यात झालेल्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी झाली नाहीच. उलट प्रश्न तसेच ठेवून धरणात पाणी अडविले गेले. अनेक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तसेच राहिल्याने अस्वस्थ झालेल्या धरणग्रस्तांनी जलसमर्पणाचा इशारा दिला होता.
ठरल्याप्रमाणे धरणग्रस्त आंदोलनासाठी येत असतानाच प्रशासनाने उपविभागीय स्तरावर बैठक घेण्याचे लेखी पत्र दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
यावेळी तहसीलदार विकास अहिर, साहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, उपविभागीय अभियंता दिनेश खट्टे, शाखा अभियंता बारदेसकर, कॉ. शिवाजी गुरव, बजरंग पुंडपळ, सागर सरोळकर, सचिन पावले, शिवाजी येजरे, महादेव खाडे, मनोहर पाटील, शामराव साबळे यांच्यासह आंबेओहोळ प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथे तहसीलदार विकास अहिर यांना कॉ. संपत देसाई यांनी धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी कॉ. शिवाजी गुरव व धरणग्रस्त उपस्थित होते.
क्रमांक : १३०८२०२१-गड-०७