जलवाहिनीला गळती; लाखो लिटर पाणी वाया
By admin | Published: April 24, 2016 01:01 AM2016-04-24T01:01:54+5:302016-04-24T01:01:54+5:30
हॉकी स्टेडियमजवळील प्रकार : नागरिकांतून संताप; काम युद्धपातळीवर सुरू
कोल्हापूर : राज्य दुष्काळाने होरपळत असताना कोल्हापुरात मात्र मुख्य जलवाहिनींना लागलेल्या गळतीमुळे दररोज अनेक ठिकाणी लाखो लिटर पाणी रस्त्यांवरून वाहत असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. रिंगरोडवर ठिकठिकाणी लागलेल्या पाणी गळतीमुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. ध्यानचंद हॉकी स्टेडियमनजीक लागलेली गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर महानगरपालिकेने हाती घेतले आहे, त्यामुळे आयसोलेशन हॉस्पिटल, जवाहरनगर, नेहरूनगर परिसरावर त्याचा परिणाम होऊन या भागातील पाणीपुरवठा आज, रविवारीही बंद राहणार असून, तो उद्या, सोमवारी सुरळीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्य दुष्काळाच्या छायेत आहे, पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. एकेकाळी संपूर्ण कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कळंबा तलावातील पाणी प्रथमच संपले आहे, तर राधानगरी धरणातील पाणीसाठाही जूनअखेरपर्यंत पुरेल इतकाच आहे. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे धोरण महानगरपालिका प्रशासनाने घेतले आहे, पण तरीही शहराच्या रिंगरोडवर मुख्य जलवाहिनीची चाळण झाल्याने त्यातून ठिकठिकाणी गळती लागल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणची गळती काढण्यात महानगरपालिका प्रशासनाला अपयश आल्याने त्यांनी पाणी थेट गटारीत सोडले आहे.
संभाजीनगर ते सायबर कॉलेजकडे जाणाऱ्या रिंगरोडवर हॉकी स्टेडियमनजीक शनिवारी सकाळी जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहून जात होते. या परिसरातून ये-जा करणाऱ्या वाहनांना पाण्यातून मार्गस्थ होताना पावसाळ्याचा भास होत होता.जाग आल्यानंतर प्रशासनाने धाव घेत या जलवाहिनीचा पाणीपुरवठा प्रथम बंद करून दुुरुस्तीचे काम सुरू केले. आज, रविवार सकाळपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. फुलेवाडी रिंगरोडवरीलही ठिकठिकाणी लागलेली गळती काढण्याचे काम गेल्या चार दिवसांपासून महानगरपालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. शुक्रवारी नवीन वाशी नाका येथील गळती काढली.