भरपावसात झाडांना टँकरद्वारे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:30 AM2021-09-07T04:30:03+5:302021-09-07T04:30:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापालिकेच्या टँकरद्वारे रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडांना भरपावसात पाणी घालण्याचा व्हिडिओ सोमवारी समाज माध्यमांवर चर्चेचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महापालिकेच्या टँकरद्वारे रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडांना भरपावसात पाणी घालण्याचा व्हिडिओ सोमवारी समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरला. या कृत्यावर जोरदार टीकाही झाली. महापालिका कर्मचारी फारच दक्ष असल्याची तसेच सार्वजनिक पैशांचा व पाण्याचा हा अपव्यय असल्याची शेरेबाजी झाली.
महानगरपालिकेचा एक टँकरचालक टँकरमधील पाणी झाडांना घालत असताना परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याचे व्हिडिओ कोणीतरी तयार करून तो शेअर केला. हा व्हिडिओ सोमवारी वेगाने व्हायरल झाला. जोरदार पाऊस पडत असताना झाडांना पाणी घालणे जरा खटकणारे असल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू झाली. नाद करायचा नाही, लई हुशार महापालिका प्रशासन, सार्वजनिक पैशाचा अपव्यय, किती कर्तव्यदक्ष कर्मचारी, अशी शेरेबाजी समाज माध्यमावर झाली. ही बाब महापालिका प्रशासनापर्यंत गेली. काही अधिकाऱ्यांनी चौकशी करून माहिती करून घेतली आणि तत्काळ खुलासाही केला.
महापालिकेचा पाण्याचा टँकर (क्रमांक एमएच०९- ४१२) हा पंक्चर झाला होता. पाण्याने भरलेला हा टँकर वर्कशॉपपर्यंत न्यायचा म्हटले तर टायर व इनर अधिकच खराब होईल म्हणून चालक संदीप गुरव यांनी टँकरमधील पाणी कमी करण्याचा निर्णय घेतला. पाणी रस्त्यावर सोडून देण्यापेक्षा त्यांनी ते रस्त्याच्यामधील झाडांना घालण्यास सुरुवात केली. नेमका त्याच वेळी पाऊस सुरू असल्याने त्याचा कुणीतरी व्हिडिओ केला.