पाण्यासाठी शनिवार उजाडणार

By Admin | Published: August 19, 2016 12:21 AM2016-08-19T00:21:41+5:302016-08-19T00:36:54+5:30

जलवाहिनी जोडली तरीही प्रतीक्षाच : टॅँकरसाठी नगरसेवकांत चढाओढ; वादावादीचे प्रसंग

Water will be lit for Saturday | पाण्यासाठी शनिवार उजाडणार

पाण्यासाठी शनिवार उजाडणार

googlenewsNext

कोल्हापूर : चंबुखडी परिसरात फुटलेली ११०० एम.एम. जाडीची मुख्य जलवाहिनी जोडण्यात पाणीपुरवठा विभागास गुरुवारी सायंकाळी यश आले खरे पण शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास उद्या, शनिवार उजाडावा लागणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील निम्म्या भागास पाणीपुरवठा होत नसल्याने गुरुवारी पाण्याचे टॅँकर मिळविण्यात नगरसेवकांतच चढाओढ लागली. काहीवेळा वादाचे प्रसंग निर्माण झाल्याने कळंबा जलशुद्धिकरण केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवावा लागला.
कोल्हापूर शहराच्या उपनगर आणि ई वॉर्ड परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी मंगळवारी दुपारी चंबुखडी येथे फुटली. पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी असल्याने ती तातडीने दुरुस्त करण्यात आली; परंतु त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजता त्याच ठिकाणापासून वीस फुटांवर पुन्हा जलवाहिनी फुटली. त्यामुळे चंबुखडी परिसरातील अनेक घरांतून पाणी शिरले. बुधवारी सकाळी वीस फूट अंतरातील जलवाहिनीचा फुटलेला भाग जेसीबीच्या सहायाने काढण्यात आला. त्यानंतर त्या भागात नवीन जलवाहिनी टाकण्यात आली. गेले दोन दिवस जलवाहिनीचे जोडकाम, वेल्डिंगचे काम सुरू असून, गुरुवारी दुपारी हे काम पूर्ण झाले. त्यानंतर जोडलेल्या भागात सिमेंट कॉँक्रीट टाकण्यात आले. कॉँक्रीट वाळण्यास काही तास जावे लागतात. आज, शुक्रवारी सकाळी हळूहळू पाणी उपसा सुरू केला जाणार आहे. त्यामुळे उद्या, शनिवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
गुरुवारी सायंकाळी महापौर अश्विनी रामाणे, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, कॉँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक मधुकर रामाणे यांनी जलवाहिनी दुरुस्तीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली तसेच कामाची माहिती करून घेतली. यावेळी महानगरपालिकेचे जलअभियंता मनीष पवार, शाखा अभियंता बी. जी. कुऱ्हाडे, कनिष्ठ अभियंता कुंभार उपस्थित होते.
दरम्यान, शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी महानगरपालिकेचे आठ, तर खासगी सोळा असे एकूण चोवीस टॅँकर वापरण्यात आले. कळंबा जलशुद्धिकरण केंद्रात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. या ठिकाणी महापौर अश्विनी रामाणे यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. दिवसभरात चोवीस टॅँकरच्या १०० हून अधिक फेऱ्या झाल्या होत्या. आज, शुक्रवारीसुद्धा उपनगर आणि ई वॉर्डातील पूर्वभागाला टॅँकरचाच आधार घ्यावा लागणार आहे.


पोलिस बंदोबस्त
कसबा बावडा व कळंबा जलशुद्धिकरण केंद्रातून टॅँकर वाटप होत होते; परंतु टॅँकरला जादा मागणी असल्याने अनेक नगरसेवक केंद्रावर थांबून होते. काही नगरसेवक तर टॅँकरमध्ये बसूनच होते. त्यामुळे वादावादी होत होती. त्यामुळे कळंबा जलशुद्धिकरण केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवावा लागला.

Web Title: Water will be lit for Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.