चांदोली धरणातून 3000 क्यूसेक'ने पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 12:37 PM2022-08-08T12:37:23+5:302022-08-08T16:43:23+5:30
धरणाचे चार दरवाजे 0.25 मीटर ने उचलून 3000 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु
मारुती गुरव
शितूर: मागील पंधरा दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसापासून पुन्हा दमदार सुरुवात केली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरु असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे चांदोली धरणात २८.७८ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. परिणामी धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज, दुपारी तीन वाजता वाजता पाटबंधारे विभागाचे विभागाचे उपविभागीय अभियंता किटवडकर, शाखाधिकारी गोरख पाटील यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते पाणीपूजन करून धरणाचे चार दरवाजे 0.25 मीटर ने उचलून 3000 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नदी पाणीपातळीत वाढ होवून पाणी पात्राबाहेर पडू शकते. आवश्यकतेनुसार धरणातून आणखी पाणी सोडावे लागणार आहे. सध्या धरण 80 टक्के भरले असून एकूण पाणीसाठा 28.78 टीएमसी आहे. पाण्याची आवक 10680 क्यूसेक इतकी आहे. पाणीपातळी 641.40 फूट इतकी झाली आहे.
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी पाऊस कमी झाला आहे. मात्र पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने धरणातील पाण्याचा विसर्गही बंद करण्यात आला होता. मात्र पुन्हा पावसाची संततधार सुरु झाल्याने धरण पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धरणातून पुन्हा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
चांदोली धरण पाणलोट परिसर हा पावसाचे आगार म्हणून ओळखला जातो. यावर्षी जुन महिन्यात पावसाने ओढ दिल्याने ३४. ४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणातील पाणीसाठा १० टीएमसी पर्यंत निच्चांकी खाली आला होता. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीस पावसाने दमदार हजेरी लावल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत गेली. मात्र, पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्याने या धरणातील पाण्याची आवक कमी झाली. यानंतर आता ऑगस्ट महिन्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावल्याने धरण पाणीसाठ्यात वाढ झाली.