पाणी उतरतेय इंचाइंचाने !

By admin | Published: August 9, 2016 01:11 AM2016-08-09T01:11:24+5:302016-08-09T01:11:36+5:30

पावसाची उघडीप : तिसऱ्या दिवशीही शिवाजी पूल वाहतुकीसाठी बंद; राधानगरीतून विसर्ग कमी

Watering inches! | पाणी उतरतेय इंचाइंचाने !

पाणी उतरतेय इंचाइंचाने !

Next

कोल्हापूर : जिल्ह्णात सोमवारी पावसाची उघडझाप राहिली. पावसाचा जोर ओसरला असला तरी पुराचे पाणी कमी होण्याची गती फारच संथ आहे. तास दोन तासाला एक इंच अशा प्रमाणात हे पाणी उतरत आहे. कोयना, वारणा धरणांतून विसर्ग सुरू असल्याने पंचगंगेच्या पाण्याची फूग कायम राहिली असल्याने पूरस्थिती कायम आहे. सायंकाळी सहापर्यंत पंचगंंगेची पातळी ४३.७ फुटांपर्यंत होती. अनेक मार्गांवरील पाणी कमी झाले असले तरी अद्याप ५९ बंधारे पाण्याखाली आहेत.
गेले दोन दिवस पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. अधून-मधून जोरदार सरी कोसळत असल्या तरी ऊनही कडकडीत पडत आहे. पाऊस कमी असला तरी नद्यांच्या पाणी पातळी ज्या गतीने कमी होणे अपेक्षित होती, ती होत नाही. जिल्ह्यातील राधानगरी, कासारीसह लहान धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यातच वारणा व कोयनेतून विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीची पातळी अद्याप कमी झालेली नाही. त्याची फूग पंचगंगा नदीला असल्याने वारणा, भोगावती नद्यांची पातळी एकदम संथगतीने कमी होत आहे. अनेक मार्गांवरील पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरळीत झाली असली तरी अद्याप ५९ बंधारे पाण्याखालीच आहेत. त्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत आहे. एस.टी.चे मार्ग बऱ्यापैकी सुरू झाले असून कोल्हापूर ते पन्हाळा, रंकाळा ते राधानगरी, रंकाळा ते चौके, इचलकरंजी ते कागल, गगनबावडा ते कोल्हापूर हे मार्ग अंशत: बंद आहेत. जिल्ह्णात ३१ घरांची अंशत: पडझड झाली असून त्यामुळे साडेपाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी सकाळी आठपर्यंत जिल्ह्यात सरासरी १९.१८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस आजरा तालुक्यात ५१.५० मिलिमीटर झाला आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दोन दरवाजे दुपारी बारा वाजता खुले झाल्याने त्यातून प्रतिसेकंद ५०५६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
शहरातील जनजीवन पूर्वपदावर
पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीतही घट होऊ लागली आहे. पावसाने उघडीप दिल्याने सोमवारी शहरवासीयांचे जनजीवन पूर्वपदावर आले. सोमवारी सायंकाळी पाणीपातळी सात वाजता ४३ फूट ७ इंच होती. रविवारच्या तुलनेत १ फुटांनी पाणी उतरले आहे. दोन दिवसांपासून पुराचे पाणी गायकवाड वाडा ओलांडून जामदार क्लबच्या पुढे होते.
पुराचे पाणी ओसरू लागल्याने त्यात सुधारणा होऊन हे पाणी जामदार क्लबच्या पाठीमागे गेले आहे, तर शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली येथे साचलेल्या पाण्याचा निचरा झाल्याने हा परिसरही वाहतुकीसाठी खुला झाला. यासह व्हीनस कॉर्नर येथील गाडी अड्डा येथील पाणीही ओसरू लागले आहे. पावसाने उघडीप दिल्याने शहरवासीयांचे जनजीवन सुरळीत होत आहे. जयंती नाल्यामध्ये शहरातून वाहून आलेले थर्माकोल व अन्य गाळ काढण्याचे काम सोमवारी महापालिकेकडून युद्धपातळीवर सुरू होते.
पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने सावधानता म्हणून सोमवारी तिसऱ्या दिवशीही जिल्हा प्रशासनाने पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल सर्व वाहनांसाठी बंद ठेवला होता. विशेष म्हणजे गेले दोन दिवस पर्यटनस्थळासारखी गर्दी या पुलावर होती.
पोलिसांनी लोखंडी बॅरेकेटस लावून या परिसरातून बघ्यांना हटविले तर आंबेवाडी, वडणगे, केर्ली, चिखली या गावात जाणाऱ्या नागरिकांना पायी सोडले जात होते. पुलावर दोन पोलिस गाड्या लावून हा परिसर बंद केला आहे तर जोतिबा षष्ठी यात्रा असल्याने अग्निशमन दलाची एक गाडी व जवान तैनात केले आहेत.
उत्साही तरुणांना लगाम
आंबेवाडी रेडेडोह व वडणगे पोवार पाणंद या ठिकाणी काही उत्साही तरुण पाण्यातून ये-जा करत होते. त्यातून धोका निर्माण होऊ नये म्हणून व्हाईट आर्मीचे जवान लाईफ जॅकेटसह तैनात केले होते. सायंकाळी पाण्याचा जोर ओसरू लागल्याने २५ जणांचे पथक जोतिबा मंदिर येथे षष्ठी यात्रा सुरू झाल्याने या ठिकाणी हलविण्यात आले.
तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये असा : हातकणंगले-४.७५, शिरोळ-२.१४, पन्हाळा-२२.५७, शाहूवाडी-२९, राधानगरी-३४.५०, गगनबावडा-३१.५०, करवीर-८.३६, कागल-५.५७, गडहिंग्लज-३.८५, भुदरगड-१७.२०, आजरा-५१.५०, चंदगड-१९.१६.

‘एनडीआरएफ’ची पाच जवानांची तुकडी दाखल
पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार दोन दिवसांपूर्वी ‘एनडीआरएफ’चे २२ जणांचे पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे. त्यांच्याकडून पूरबाधित ठिकाणी पाहणी करण्यात आली आहे. संभाव्य परिस्थितीमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव रविवारी रात्री आणखी पाच जवानांची तुकडी कोल्हापुरात दाखल झाली.

दहा तासांत सात इंच पातळी कमी
वारणा व कोयना धरणातून विसर्ग सुरू असल्याने कृष्णा व पंचगंगेची पाणी पातळीत संथगतीने कमी होत आहे. पंचगंगेची सकाळी आठ वाजता ४४.४ फूट पाणी पातळी होती. सायंकाळी सहा वाजता ती ४३.७ फुटापर्यंत खाली आली. म्हणजे दहा तासात अवघी ७ इंच पातळी कमी झाली.

अलमट्टी धरणासाठी पाणीसाठा कायम
विजापूर : सोमवारी पावसाचा जोर ओसरला असून अलमट्टी धरणातील पाणीसाठा ८६ टक्के कायम आहे. धरणात प्रतिसेकंद एक लाख ७६ हजार २३ घनफूट पाण्याची आवक तर एक लाख ७४ हजार २७५ घनफूट विसर्ग करण्यात येत आहे. धरणाची १२४ टीएमसी क्षमता असून १0४ टीएमसी धरण भरले आहे. कोयना धरणातून १८ हजार ३५५ क्युसेक विसर्ग सुरू असून हे पाणी आल्यास एक ते दीड फूट पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कृष्णा नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

Web Title: Watering inches!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.