पाणीप्रश्नी मुरगूड नगरपालिकेला टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 12:57 AM2019-04-30T00:57:27+5:302019-04-30T00:57:32+5:30
मुरगूड : मुरगूड शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. याबाबत वेळोवेळी पालिका प्रशासनाला सूचना देऊनही ...
मुरगूड : मुरगूड शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. याबाबत वेळोवेळी पालिका प्रशासनाला सूचना देऊनही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असा आरोप करीत उपनगराध्यक्ष, पक्षप्रतोद, विरोधी पक्षनेता यांच्यासह तब्बल १६ नगरसेवकांनी राजीनामे दिले, तर
संतप्त नागरिकांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्षांना जाब विचारत पालिकेला टाळे ठोकले. नागरिकांनी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना घेराव घालून प्रश्नांचा भडिमार केला. शुद्ध आणि योग्य दाबाने सुरळीत पाणीपुरवठा जोपर्यंत होत नाही, तोपर्यंंत नगराध्यक्ष आणि अधिकाऱ्यांना पालिकेत येऊ न देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुरगूड शहरासह यमगे आणि शिंदेवाडी या गावांना पिण्यासाठी सर पिराजीराव तलावातून पाणी पुरवले जाते. अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याच्या तक्रारी होत्या. वेळोवेळी याबाबत प्रशासनाने नागरिकांना आश्वासने दिली होती; पण या समस्येबाबत ठोस कार्यवाही झाली नाही. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांत प्रचंड असंतोष होता.
सोमवारी सकाळी संतप्त नागरिक नगरपालिकेच्या आवारात जमले. यावेळी नागरिकांच्या भावना समजून घेत त्यांच्या समवेत उपनगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. तसेच नगराध्यक्ष राजेखान जमादार हेही कार्यालयात उपस्थित होते. नागरिकांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना त्यांच्या कार्यालयातून बाहेर काढत यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले. त्यावेळी उपनगराध्यक्ष मेंडके यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले. त्यानंतर पालिकेसमोर मुख्याधिकारी यांना संतप्त नागरिकांनी घेराव घालत प्रश्नांचा भडिमार केला; पण त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.
यावेळी नामदेवराव मेंडके यांनी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या हट्टवादी भूमिकेमुळे गटाची बदनामी होत आहे. आम्ही सुचविलेल्या मुद्द्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करते. त्यामुळे आपण राजीनामे देत असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्व नगरसेवक कार्यालयात गेले आणि एकत्रितपणे राजीनामा तयार करून ते गटप्रमुख संजय मंडलिक यांच्याकडे सुपूर्द केले.
उपनगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, जयसिंग भोसले, शिवाजीराव चौगले, धनाजीराव गोधडे, दीपक शिंदे, संदीप कलकुटकी, मारुती कांबळे, प्रतिभा सूर्यवंशी, सुप्रिया भाट, हेमलता लोकरे, रेखा मांगले, वर्षाराणी मेंडके, रंजना मंडलिक, अनुराधा राऊत या मंडलिक गटाच्या, तर पाणीपुरवठा समितीचे सभापती रविराज परीट व विरोधी पक्ष नेते राहुल वंडकर यांनी राजीनामे दिले.
टाळे टोकताना सुखदेव येरुडकर, पांडुरंग भाट, किरण गवाणकर, दत्तात्रय मंडलिक, भगवान लोकरे, गुंड्या चव्हाण, युवराज सूर्यवंशी, सुनील चौगले, सर्जेराव पाटील, आबासो खराडे, भारत भाट, सुशांत मांगोरे, आनंदा मांगले, आदी उपस्थित होते.
अहवालात प्रशासनावर ठपका
दरम्यान, शहराला पिण्यासाठी पुरविले जाणारे पाणी, तसेच सर पिराजीराव तलावातील पाणी आणि वेदगंगा नदीतील पाणी तपासण्यासाठी बंगलोरमध्ये पाठविण्यात आले होते. याचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला असून, त्यामध्ये तलावातील आणि नदीतील पाणी पिण्यास योग्य आहे, पण पालिकेच्या फिल्टरमधून शहरात जाणारे पाणी मात्र पूर्णपणे आरोग्यास घातक असल्याची नोंद केली आहे. त्यामुळे फिल्टर हाऊसमध्येच दोष असल्याचे अधोरेखित होते.