कळंब्यासह उपनगरांवर पाणीसंकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 11:53 PM2017-08-13T23:53:36+5:302017-08-13T23:53:36+5:30
अमर पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबा : काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भविष्यात उपनगरवासीयांसह कळंबा ग्रामस्थांवर पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कळंबा तलावाची पाणीपातळी २७ फुटांवर गेली की, तलाव भरून सांडव्यावरून वाहतो. सध्या पाणीपातळी २० फुटांपेक्षा खाली स्थिरावली आहे. यातील जलचरांच्या अस्तित्वासाठी सात फूट पाणीसाठा कायम ठेवावा लागतो. तलावातून पाणीपुरवठा करणाºया जलवाहिन्यांच्या गळत्या काढण्यासाठी पालिकेने पाणी उपश्यावर बंदी आणली आहे. महिन्याभरात दमदार पाऊस न झाल्यास पाणीटंचाईची भीषणता जाणवणार हे मात्र निश्चित.
जुलै महिन्यात आठवडाभर पाऊस चांगला झाला. त्यामुळे तलावात पाणीसाठा वेगाने वाढला. मात्र त्यानंतर पावसाने चांगलीच उसंत घेतली. आता पुरेसा पाऊस न झाल्यास पुढील वर्षी पाणी मिळणार की नाही, अशी चिंता निर्माण झाली आहे.
कळंबा तलावातून कळंबा ग्रामपंचायत १४ एचपी मोटारीद्वारे रोज दहा तास पाणी उपसा करते. उपनगरांसाठी तलावातून कळंबा फिल्टर हाऊसमध्ये चोवीस तास पाणी उपसा होतो. पुढे हे पाणी बी वॉर्ड, मंगळवार पेठेत वितरित होते. यातील पाणी सुभाषनगर पंपिंग स्टेशनमध्ये सोडून आर. के. नगर, मोरेवाडी, सुभाषनगर, वर्षानगरास वितरित होते.
गतवर्षी जलयुक्त शिवार अभियान व लोकसहभागातून तलावातील प्रचंड गाळाचा उपसा करण्यात आला. यंदाही मागेल त्याला गाळ योजनेंतर्गत गाळ उपसा करण्यास परवानगी दिली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ उपसा होऊन पाणीसाठा क्षमता वाढली. गतवर्षी अवघ्या तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने तलाव पूर्ण क्षमतेने भरला; पण तलावातून कळंबा फिल्टर हाऊसकडे जाणाºया माळवाडी व कात्यायनी कॉम्पलेक्स येथील जलवाहिन्यांच्या गळत्या न काढल्याने मार्चमध्ये पाणीपातळी सात फुटांवर आली. परिणामी, पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी उपसा करून कळंबा उपनगराची तहान भागविण्यात आली.
सध्या महापालिकेने गळत्यांचा प्रश्न निकाली निघेपर्यंत पाणी उपशावर बंदी आणली आहे. त्यामुळे ‘पाणी उशाला, कोरड घशाला’ अशी अवस्था झाली आहे. पावसाने अशीच दडी मारल्यास नवीन वर्षाच्या सुरुवातीसच पाणीसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या तलावात अवघा सत्तर टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुढे पाऊस न पडल्यास पाण्यासाठी दाहीदिशा वणवण भटकावे लागणार अशी चिन्हे सध्या दिसत आहेत.
तलावाचे भवितव्य प्रशासनाच्या हाती
कळंबा गाव पाण्यासाठी पूर्णत: पालिकेवर अवलंबून आहे. ग्रामस्थ पालिका मालकीच्या कळंबा तलावाचे अथवा पुईखडीचे पाणी वापरतात. पण तलाव प्रदूषित होऊ नये, याची काळजी कोणी घेत नाही. तलावाचा वापर जनावरे धुणे, आंघोळीसाठी होतोय. पाणलोट क्षेत्रातील अवैध बांधकामांनी तलावाचा श्वास गुदमरतोय. आज तलावाचे भवितव्य ग्रामपंचायत व पालिका प्रशासनाच्या हाती आहे.