वन्यजीवांसाठी दाेडामार्गच्या जंगलात तयार केला पाणवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:19 AM2021-01-02T04:19:48+5:302021-01-02T04:19:48+5:30
कोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गच्या परिसरातील केर गावामधून पाच किलोमीटर डोंगरावर जाऊन "नेत्याचे पठार" येथे गाळ व चिखल काढून ...
कोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गच्या परिसरातील केर गावामधून पाच किलोमीटर डोंगरावर जाऊन "नेत्याचे पठार" येथे गाळ व चिखल काढून निसर्गप्रेमी मित्रांनी वन्यजीवांसाठी मे महिन्यापर्यंत पुरेल असा पाणवठा तयार केला.
उन्हाळ्यात उन्हाचा तडाखा वाढत जातो, तसे वनक्षेत्रातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने पाणवठे कोरडे पडतात. यामुळे वन्यप्राण्यांचे पाण्याअभावी हाल होतात आणि मग पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळतात. असे प्राणी एखाद्या विहिरीत किंवा शेततळ्यात पडल्याने जखमी होतात, तर काही प्राणी महामार्गावरील वाहनाच्या धडकेत जखमी होतात. एखाद्दुसरा वन्यप्राणी आपला अधिवास सोडल्याने शिकाऱ्यांकडून शिकार होतो.
यासाठी या वन्यप्राण्यांना त्यांच्या अधिवासातच पाणी मिळावे व त्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी यासाठी दोडामार्ग येथील निसर्गमित्रांनी जंगलात पाणवठे तयार करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या हंगामात त्यांनी तीन डोंगराळ पाणवठे तयार केले आहेत.
जंगलात पाणवठे तयार करण्याच्या मोहिमेत निसर्गप्रेमी संजय सावंत यांच्यासोबत तुषार देसाई, अमित सुतार, संजय नाटेकर, संकेत नाईक, अनुराग सिनारी, विकास देसाई, अनिरुद्ध देसाई यांनी सहभाग घेतला.
कोट
या पाणवठ्याच्या परिसरात अनेक दुर्मिळ पक्षी, दुर्मिळ फुलपाखरे, खवले मांजराने वाळवीसाठी ओरखडलेले वारूळ, तसेच सांबर, गवे, भेकर, बिबट्या, वाघाचीही विष्ठा आढळली आहे. हे आपल्या समृद्ध जैवविविधतेचे द्योतक आहे. आपल्या संविधानानुसार नद्या, सरोवरे, वने, अरण्ये वगैरेसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन केले पाहिजे. प्रत्येक गावाच्या तरुण मंडळांनी असे विधायक उपक्रम राबविल्यास अनेक पशु-पक्ष्यांना लुप्त होण्यापासून आपण वाचवू शकतो.
- संजय सावंत,
निसर्गप्रेमी, तिलारी, जि. सिंधुदुर्ग.
(फोटो : ३११२२०२०-कोल-पाणवठा, ३११२२०२०-कोल-निसर्गमित्र दोडामार्ग)