‘जलयुक्त शिवार’ने शेकडो हेक्टर ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2016 12:03 AM2016-10-26T00:03:36+5:302016-10-26T00:06:06+5:30

भुदरगड, आजरा तालुका : अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी

'Watery Shiver' has hundreds of hectare heights | ‘जलयुक्त शिवार’ने शेकडो हेक्टर ओलिताखाली

‘जलयुक्त शिवार’ने शेकडो हेक्टर ओलिताखाली

Next

शिवाजी सावंत -- गारगोटी -शासनाच्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जलयुक्त शिवार योजनला प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांनी वेगळा आयाम देऊन सव्वा कोटी रुपयांची कामे पूर्ण करून पुढील वर्षाकरिता अडीच कोटींची तरतूद करून घेतली आहे. या अभियानामुळे शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले, तर अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
या अभियानात महसूल विभाग, कृषी विभाग, पाणीपुरवठा विभाग, पाटबंधारे विभाग, वन विभाग, जलसंपदा विभाग, वरिष्ठ भूवैधानिक, भूजल सर्वेक्षण, सामाजिक वनीकरण विभाग, पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, आणि संबंधित ग्रामपंचायत, ग्रामस्थ, शेतकरी या सर्व घटकांचा समावेश या अभियानात करण्यात आला. या सर्व विभागांवर लक्ष ठेवून निकोप काम होण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांची अध्यक्ष म्हणून जबाबदारी निश्चित करण्यात आली. या अंतर्गत माती नाला बंधारे, मजगी, शेततळी, सीसीटी, सिमेंट नाला बंधारा, वनतळे, शेततळे, बोअरवेल व विहिरी पुनर्भरण, विहिरी व छोट्या तलावांतील गाळ काढणे, जलभरण ही कामे सूचित करण्यात आली आहेत.
भुदरगड आणि आजरा तालुक्यांत चांगला पाऊस पडतो; परंतु डोंगरदऱ्या आणि खराब झालेले भूपृष्ठ यामुळे पावसाचे पाणी लगेच निचरा होऊन नदीनाल्यांतून वाहून जाते. या तालुक्यातील बहुतांश भागात नदी नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला होता. नैसर्गिक स्रोत बंद होण्याच्या मार्गावर होते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर झाला होता की, जगणे मुश्कील झाले होते. तेथे जमिनीतील पिकांना पाणीपुरवठा करण्याचा प्रश्नच नव्हता. अशी गंभीर स्थिती निर्माण झालेल्या भुदरगड तालुक्यातील भाटिवडे, आकुर्डे, आदमापूर, टिक्केवाडी, मोरेवाडी, फये, कूर ही सात गावे, तर आजरा तालुक्यातील भादवण, लाकूडवाडी, खानापूर ही तीन अशी दोन्ही तालुक्यांतील मिळून दहा गावे निवडली. दोन्ही तालुक्यांसाठी अहवाल साल २0१५ - २0१६ साठी अनुक्रमे ४४ लाख एक हजार रुपये व ८0 लाख १४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. यामध्ये सर्व ठिकाणी मिळून ४२ कामे पूर्ण केली.
यावेळी प्रांताधिकारी कीर्ती नलावडे म्हणाल्या, या अभियानात असलेल्या सर्व विभागांतील अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, शेतकरी वर्ग यांनी मनापासून चांगले काम
केले.


या अभियानामुळे जमिनीची धूप थांबली. जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविले गेले. पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पाण्याची गती मंदावली. बांधाच्या प्रभावामुळे विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. शेततळ्यातील पाण्यामुळे पिकांना संरक्षित पाणीपुरवठा उपलब्ध झाला आहे.

जमिनीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. भुदरगड तालुक्यात १.0४ टीसीएम पाणीसाठा, तर आजरा तालुक्यात ४.५६१ टीसीएम साठा उपलब्ध झाला आहे. स्थानिक पातळीवरील नैसर्गिक स्रोतांचे योग्य व्यवस्थापन झाल्याने, तसेच सायफन पद्धतीने पाणी आणल्यामुळे वीज बिलाची बचत, बारमाही स्वच्छ आणि शुद्ध पाणी, गावातील घराघरांत पाणीपुरवठा होऊ शकल्याने महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबली आहे. शेतीतील उत्पन्नात वाढ झाली आहे.

Web Title: 'Watery Shiver' has hundreds of hectare heights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.