वटपौर्णिमा, बेंदराची घराघरांत लगबग, रंगवलेल्या बैलजोड्यांना मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 19:01 IST2018-06-25T18:52:23+5:302018-06-25T19:01:23+5:30
रखरखत्या उन्हाळ्यानंतर पडणाऱ्या पावसाच्या सरींसोबत सणांच्या आगमनाची वार्ता घेऊन येणारी वटपौर्णिमा आणि कर्नाटकी बेंदूर यानिमित्त घराघरांत तयारीची लगबग सुरू आहे. पती-पत्नीच्या नात्याची वीण घट्ट करणारी वटपौर्णिमा तसेच शेतकऱ्यांचे सखा असलेले बैल, गाय, म्हैस या प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा कर्नाटकी बेंदूर बुधवारी साजरा होत आहे.

वटपौर्णिमा, बेंदराची घराघरांत लगबग, रंगवलेल्या बैलजोड्यांना मागणी
कोल्हापूर : रखरखत्या उन्हाळ्यानंतर पडणाऱ्या पावसाच्या सरींसोबत सणांच्या आगमनाची वार्ता घेऊन येणारी वटपौर्णिमा आणि कर्नाटकी बेंदूर यानिमित्त घराघरांत तयारीची लगबग सुरू आहे. पती-पत्नीच्या नात्याची वीण घट्ट करणारी वटपौर्णिमा तसेच शेतकऱ्यांचे सखा असलेले बैल, गाय, म्हैस या प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा कर्नाटकी बेंदूर बुधवारी साजरा होत आहे.
जानेवारी महिन्यातील संक्रांतीनंतर पुढे जून महिन्यातील वटपौर्णिमेपर्यंत गुढीपाडवा वगळता कोणताही मोठा सण येत नाही. त्यात यंदा दर तीन वर्षांनी येणारा अधिक महिना मेमध्ये सुरू झाल्याने सगळेच सण एक-एक महिन्याने पुढे गेले आहेत. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारी वटपौर्णिमा आणि बेंदूर हे सण महिन्याच्या अखेरीस आले आहेत.
यानिमित्त बाजारपेठेत वडपूजेसाठी लागणारे सूप, दोरा, हळद-कुंकू, ओटीचे साहित्य, लहान आंबे, फणस या साहित्यांची लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, टिंबर मार्केट, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड या प्रमुख बाजारपेठांत रेलचेल आहे.
बेंदराला शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैल, गाय, म्हैस या प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. ग्रामीत भागात हे प्राणी घरोघरी असल्याने तेथे प्रत्यक्ष प्राण्यांचे औक्षण करून गोडधोडाचे जेवण दिले जाते. शहरात मात्र ही सोय नसते, त्यामुळे मातीपासून बनवलेल्या बैलजोडीचे पूजन केले जाते.
यानिमित्त घरोघरी हरभऱ्याच्या डाळीच्या पीठाच्या गोड चकल्या केल्या जातात. यानिमित्त शहरातील पापाची तिकटी, शाहूपुरी कुंभार गल्ली व बापट कॅम्प येथे मातीच्या बैलजोड्या विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांत आकर्षक रंगवलेल्या बैलजोड्यांना मागणी वाढली आहे. या बैलजोड्या दहा रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.