नृसिंहवाडी कोरोना हॉटस्पॉट बनण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:38 AM2021-05-05T04:38:13+5:302021-05-05T04:38:13+5:30
नृसिंहवाडी : नृसिंहवाडी येथे गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत आहे. तसेच गावच्या लोकसंख्येच्या मानाने गावातील कोरोना पॉझिटिव्ह ...
नृसिंहवाडी : नृसिंहवाडी येथे गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत आहे. तसेच गावच्या लोकसंख्येच्या मानाने गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पन्नासपर्यंत झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात श्री क्षेत्र नृसिंहवाडी कोरोना हॉटस्पॉट बनण्याच्या मार्गावर आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते व मराठा क्रांती मोर्चाचे राज्य सदस्य सागर धनवडे यांनी निवेदनाद्वारे केला आहे.
गावात येणाऱ्या नागरिक व भाविकांचे थर्मल टेस्टिंग, पॉझिटिव्ह रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांची व संपर्कात आलेल्या लोकांची यादी व त्यांचे स्वॅब घेणे व घरात उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहिती व पाहणी, औषध फवारणी व इतर अनेक गोष्टींत दुर्लक्ष केल्यामुळे अशी वाईट परिस्थिती येऊ शकते. यासंदर्भात गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, आरोग्य अधिकारी यांना माहिती दिली होती. त्यांनीसुद्धा योग्य सूचना दिल्या होत्या; मात्र गावातील बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांनीसुद्धा यासंदर्भात अधिकाऱ्यांना माहिती दिली. तसेच शिरोळ तहसीलदार यांना गावातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या आलेखाचा आढावा दिला आहे.
यात ग्रामपंचायतीने थोडा हातभार लावला असता, तर ही परिस्थिती उद्भवली नसती. तरी पुढील येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ बैठक घेऊन यासंदर्भात उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा दत्त राजधानी श्री क्षेत्र नृसिंहवाडी कोरोनाचे हॉटस्पॉट बनल्याशिवाय राहणार नाही.