आम्ही तुम्हाला स्वीकारले, तुम्ही का नाकारता ?
By admin | Published: June 6, 2015 12:23 AM2015-06-06T00:23:48+5:302015-06-06T00:28:27+5:30
राजेश लाटकर : महानगरपालिका हद्दवाढप्रश्नी मुश्रीफ, पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक यांना खडे बोल
कोल्हापूर : पी. एन. साहेब, आपण करवीरचे नेतृत्व करता... मुश्रीफसाहेब, आपण कागलमध्ये राहता... आमदार महादेवराव महाडिक, आपण तर शिरोलीत राहूनही गेली पंधरा वर्षे महापालिकेचे नेतृत्व केलेत... बंटीसाहेब, आपण शहरात राहूनही हद्दवाढीबाबत उदासीन आहात... आम्ही शहरवासीयांनी तुमच्या ग्रामीण अंगाकडे डोळेझाक करून तुमचे नेतृत्व स्वीकारले अन् तुम्ही मात्र शहराच्या हद्दवाढीला विरोध करता? असा खडा सवाल राष्ट्रवादीचे गटनेते व शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत उपस्थित केला.
गेली पंधरा वर्षे सत्तेत असूनही कॉँग्रेस व राष्ट्रवादीला शहराची हद्दवाढ करता आली नाही, हे आमचे अपयश असल्याची खंतही लाटकर यांनी यावेळी बोलून दाखविली.
शहरालगतच्या गावातील जनतेला शहराच्या सर्व सोयीसुविधा वापरावयास हव्यात; हद्दवाढ मात्र नको आहे. हद्दवाढ नको म्हणणाऱ्या गावांच्या अग्निशमनसारख्या अत्यावश्यक सेवा आम्ही रोखण्याचा आग्रह धरल्यास चालेल काय? शहरात येऊ न दिल्यास शेतातील भाजी कुठे विकणार? महाविद्यालयीन शिक्षणासह उच्च आरोग्यसेवा कुठे घेणार? शहरात या; मोठ्या भावाप्रमाणे तुमची देखभाल करू. ‘ड’ वर्ग पालिकेत सर्वांत चांगला कारभार आमचा आहे. घोटाळे काय ग्रामीण भागात कमी आहेत काय? पराचा कावळा करून शहराचा श्वास रोखण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असा इशाराही लाटकर यांनी यावेळी दिला.
ऐतिहासिक कोल्हापूरची हद्दवाढ रोखण्याचा प्रयत्न झाल्यास मोर्चे, आंदोलने व उपोषणे केली जातील. पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, केएमटी, शिक्षण, अग्निशमन अशा सेवा रोखण्यास आम्हाला भाग पाडू नका. प्रसंगी आताच नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा लागला तरी हरकत नाही. मात्र, हद्दवाढ झाल्याखेरीज आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे स्थायी समितीचे आदिल फरास यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
ग्रामीण जनतेला विश्वासात घेतल्याखेरीज हद्दवाढीच्या प्रस्तावास काही अर्थ नाही. उपनगरांत सुविधा देण्यास प्रशासन अपुरे पडत असल्याचा आरोप होतो. आमदार हसन मुश्रीफ व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आणलेल्या निधीव्यतिरिक्त प्रशासनाने स्वनिधीतून कोणती विकासकामे केली? प्रशासनाने विरोधामागील योग्य तो बोध लक्षात घ्यावा. हद्दवाढीस विरोध करणारे ग्रामीण भागांतील सर्व नेते शहरातच राहतात. नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करू. मनपा प्रशासनानेही ग्रामीण भागात हद्दवाढीसाठी जनजागृती मोहीम आखावी, अशी सूचना शारंगधर देशमुख यांनी केली.
कागदी घोडे नाचविण्यासाठी हद्दवाढीचा प्रस्ताव नको, तर ठोस निर्णय होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचा निर्धार महापालिकेच्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
दादा... आपण ब्रेन आहात...!
दादा, आपण सरकारच्या मध्यवर्ती ठिकाणी आहात. सरकारचे ब्रेन आहात. आम्हास सत्ता असताना हद्दवाढीचे शहाणपण सुचले नाही. ती चूक आपण करू नका. हद्दवाढीचे प्रस्ताव अनेकवेळा गेले. तसा हा प्रस्ताव ठरावयास नको. हद्दवाढ करा म्हणजे येत्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रचारात चांगला मुद्दा सापडेल. हद्दवाढ करणार असाल तर विशेष अधिकार वापरून प्रस्ताव आल्यानंतर दोन दिवसांत अधिसूचना काढा. नाहीतर आठ दिवसांत महापालिकेचे ‘अ’ वर्ग नगरपालिकेत तरी रूपांतर करा, अशी मागणी राजेश लाटकर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली.