सापडलेले बाळ कुणीही नेतो म्हणणे बेकायदेशीर; दत्तक प्रक्रिया असते कशी.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 17:44 IST2025-02-22T17:44:40+5:302025-02-22T17:44:57+5:30

ती न केल्यास होतो गुन्हा दाखल

We adopt guardianship after finding an orphaned baby, so it is a crime by law to take a baby into a mutual home | सापडलेले बाळ कुणीही नेतो म्हणणे बेकायदेशीर; दत्तक प्रक्रिया असते कशी.. जाणून घ्या

संग्रहित छाया

कोल्हापूर : एखादे अनाथ बाळ सापडल्यानंतर आम्ही पालकत्व स्वीकारतो, म्हणून बाळाला परस्पर घरी नेणे हा कायद्याने गुन्हा आहे, त्यामुळे बाळ सापडले की सांभाळण्याचा माेह टाळून त्याची माहिती सर्वात आधी पोलिसांना द्या अन्यथा गुन्हा दाखल होण्याचा धोका आहे. बालकल्याण समितीच्या नियमानुसार बाळाच्या मुक्ततेच्या कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यावर ते दत्तक दिले जाते.

हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे गुरुवारी स्त्री अर्भक सापडल्यानंतर मुंगुरवाडीतील दाम्पत्याने चांगुलपणाच्या भावनेने बाळाचे पालकत्व स्वीकारण्याची तयारी दाखवली. मात्र, एखादे बाळ सापडले की ने घरी असे होत नाही. त्याबद्दलची साक्षरता समाजात अजूनही नाही. कोणत्याही बाळाला कायदेशीररीत्या दत्तक घ्यावे लागते. त्यासाठी दाम्पत्याला केंद्र शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागते. त्यांचे चारित्र्य पडताळणीपासून ते संपत्तीपर्यंतची तपासणी केली जाते. दाम्पत्य बाळ सांभाळू शकते, याची खात्री पटल्यावर त्यांचे नाव वेटिंग लिस्टमध्ये जाते. देशभरातील जे बाळ दत्तक प्रक्रियेसाठी मुक्त झालेले असते, ते बाळ दिले जाते.

जिजा बालकल्याणमध्ये दाखल

हलकर्णी येथे गुरुवारी सापडलेले स्त्री जातीचे अर्भक तातडीने मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलमध्ये दाखल करण्यात आले. संस्थेने बाळाचे जिजा असे नामकरण केले आहे. जिजाला शुक्रवारी पोलिसांच्या अहवालाने बालकल्याण समितीसमोर सादर करण्यात आले. त्यानंतर रितसर बाळाला शिशुगृहात दाखल केले जाईल.

अशी असते दत्तक प्रक्रिया

  • बाळ ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडते तेथील पोलिसांकडून बाळाला बालकल्याण समितीकडे सादर केले जाते.
  • कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर समितीकडून बाळाच्या पालकांचा शोध घेतला जातो. तशी जाहिरात दिली जाते.
  • प्रसिद्धीनंतर एक महिन्याच्या आत बाळाची आई, वडील किंवा नातेवाइकांनी संपर्क साधला नाही, तर बाळाला दत्तक प्रक्रियेसाठी मुक्त केले जाते.
  • बाळाची नोंद शासनाच्या कारा पोर्टलवर केली जाते.
  • याच पोर्टलवर वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या पालकांना बाळ दत्तक दिले जाते.
  • देशभरातील कोणत्याही शिशुगृहातील बाळ दत्तक म्हणून दिले जाते. त्यामुळे कोल्हापुरात सापडलेले बाळ कोल्हापुरातल्याच दाम्पत्याला दिले जाते असे नाही.

बाळ सापडले की, पोलिसांना न कळवता घरी नेणे कायद्याने गुन्हा आहे. बाळाला संस्थेत दाखल करून घेतल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया केली जाते. बाळाची वैद्यकीय तपासणी होते. त्यानंतर ९० दिवसांमध्ये दत्तक प्रक्रिया केली जाते.  - पद्मजा गारे सदस्य (बालकल्याण समिती), कोल्हापूर.

Web Title: We adopt guardianship after finding an orphaned baby, so it is a crime by law to take a baby into a mutual home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.