आम्ही सगळे दहावी पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:20 AM2021-07-17T04:20:03+5:302021-07-17T04:20:03+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द झाल्याने यंदा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे शुक्रवारी ऑनलाइन निकाल जाहीर झाला. त्यात अर्ज ...
कोल्हापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द झाल्याने यंदा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे शुक्रवारी ऑनलाइन निकाल जाहीर झाला. त्यात अर्ज भरून मूल्यांकन प्राप्त कोल्हापूर विभागातील १,३४,८३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे ‘आम्ही सगळे दहावी पास’ असे आनंदाचे वातावरण विद्यार्थ्यांमध्ये होते. कोल्हापूर विभाग ९९.९२ टक्क्यांसह राज्यात आठव्या क्रमांकावर राहिला. गेल्या वर्षीच्या तुलनेत २.२८ टक्क्यांनी निकाल वाढला.
या विभागातील लेखी आणि अंतर्गत परीक्षा दिली नसलेले अवघे १०६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. कोल्हापूर विभागात ९९.९४ टक्क्यांसह सांगली जिल्हा अव्वल ठरला. सातारा जिल्हा ९९.९२ टक्क्यांसह द्वितीय, तर कोल्हापूर जिल्हा ९९.९२ टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर राहिला. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव देवीदास कुलाळ यांनी निकालाची माहिती दिली. यंदा कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील १,३४,९४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील १,३४,९३९ जणांचे मूल्यांकन प्राप्त होऊन त्यापैकी १,३४,८३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ७३४०३ मुले उत्तीर्ण झाली असून, त्यांचे प्रमाण ९९.९० टक्के, तर ६१४३० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे प्रमाण ९९.९३ टक्के आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ०.०३ टक्के जादा आहे.
जिल्हानिहाय निकाल
सांगली : ९९.९४ टक्के
सातारा : ९९.९२ टक्के
कोल्हापूर : ९९.९० टक्के
विभागाचा निकाल एका नजरेत
एकूण माध्यमिक शाळा : २२९९
विशेष प्रावीण्य श्रेणीतील उत्तीर्ण विद्यार्थी : ५७३१०
प्रथम श्रेणी व ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी : ५३७४१
गैरमार्ग प्रकारांबाबत कारवाई झालेले विद्यार्थी : ४५
पुनर्प्रविष्ट विद्यार्थी उत्तीर्ण : ४१३१
प्रतिक्रिया
यावर्षी कोल्हापूर विभागाच्या दहावीच्या निकालात २.२८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विभाग राज्यात आठव्या क्रमांकावर असला, तरी अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत टक्केवारीत फार मोठा फरक नाही. विभागात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. सातारा जिल्ह्यात शंभर टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. शाळांकडून मूल्यांकन प्राप्त झाले नसलेल्या २७८ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत. त्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विभागाच्या टक्केवारीत आणखी वाढ होईल.
-देवीदास कुलाळ, विभागीय सचिव