हम भी है जोश में ! महामॅरेथॉन’मध्ये ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह दांडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 08:30 PM2020-01-05T20:30:15+5:302020-01-05T20:30:46+5:30
कोल्हापूर : ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये ज्येष्ठांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन अन्य धावपटूंप्रमाणेच आपला उत्साह दाखवीत ‘हम भी है जोश में’ ...
कोल्हापूर : ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये ज्येष्ठांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन अन्य धावपटूंप्रमाणेच आपला उत्साह दाखवीत ‘हम भी है जोश में’ हे सिद्ध करून दाखविले. धावण्याच्या मार्गावर अन्य सदस्यही ज्येष्ठांचा आदर राखत त्यांना प्रोत्साहन देत होते. विविध ठिकाणांहून आलेल्या ज्येष्ठांनी उत्साहाने महामॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला. रविवारच्या पहाटेच्या बोचऱ्या थंडीतही पहाटे पाच वाजल्यापासूनच अनेक ज्येष्ठांनी या ठिकाणी हजेरी लावली. धावणे आरोग्यासाठी उत्तम औषध आहे, असा संदेश या सर्व ज्येष्ठांनी दिला.
महामॅरेथॉनमध्ये भारतीय सैन्यदलातील जवानांसह माजी सैनिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या विभागासाठी ‘विशेष डिफेन्स रन’चे आयोजन करण्यात आले. यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी तंदुरुस्तीसाठी या महामॅरेथॉनमध्ये धावले. पोलीस कर्मचारी वेळ काढून आपल्या कुटुंबीयांसह यामध्ये सहभागी झाले होते. रविवारी शाळांना सुट्टी असल्याने अनेक आजोबा आपल्या नातवंडांसह यामध्ये सहभागी झाले होते. आरोग्यासाठी व्यायाम किती महत्त्वाचा आहे, हे ते आवर्जून नातवंडांना सांगत होते.अनेक ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहाने रनमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी फिनिश लाईन पूर्ण करताच त्यांचा उत्साह पाहून अनेक युवक-युवतींना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.