स्कूल चले हम.. ‘सुजाता दिदी’ के साथ
By admin | Published: March 7, 2017 10:58 PM2017-03-07T22:58:20+5:302017-03-07T22:58:20+5:30
४ वर्षांपासून साताऱ्यासारख्या शहरात सायंकाळी मी वेगवेळ्या शाळेतील लहान मुलांना घेऊन जाण्याचे व घरी सुखरुप सोडण्याचे काम
संजय कदम -- वाठार स्टेशन --असाध्य ते साध्य होईल तयास मनाची जिद्द चिकाटी आणि परिश्रम हे गुण अंगी असतील तर जीवनात कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे साध्य करण्यासाठी अगदी पुरुषप्रधान समाजाचा पगडा असलेल्या ड्रायव्हिंग व्यवसायात ही कोणताच कमीपणा न समजता हे एक वेगळ आव्हान म्हणून स्वीकारत गेली ४ वर्षांपासून साताऱ्यातील विविध इंग्रजी माध्यमिक शाळेत चिमुकल्यांना वेळेत सुखरुप पोहोचवण्याचे काम सुजाता सोनटक्के ही धाडसी लेडी बस ड्रायव्हर मोठ्या आनंदाने करीत आहे.
सुजाता ज्ञानदेव सोनटक्के यांचे माहेर वाई तालुक्यातील पांडे या गावात लहानाचे मोठे झाल्यानंतर त्यांनी ९ वी पर्यंतचे शिक्षण घेऊन शाळेला रामराम केला. यानंतर काही दिवसातच त्यांचा विवाह कामेरी येथील ज्ञानदेव सोनटक्के यांच्याशी झाला सासरची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांनी मुलाबाळांच्या सांभाळासाठी गावातच शेतमजुरी सारखी कामे केली. मात्र, मुलांना चांगल दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांनी सातारा गाठला. माझे पती मुंबईत पेंटिंगची छोटी-मोठी कामे करत असल्याने त्यांनीही ते काम सोडून दिले आणि साताऱ्यात आम्ही स्वत:च कपड्याला इस्त्री करण्याचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय माझे पती सांभाळत असल्याने मी नोकरीच्या शोधात होते. यातच माझे शिक्षण ९ वी पर्यंतच झाल्यामुळे चांगली नोकरी शोधूनही सापडत नव्हती. मात्र, लहान मुलांची मला पहिल्यापासूनच आवड असल्याने मी इंग्लिश मीडियम स्कूलमधील स्कूल बसमध्ये बस अटेंंडन्स म्हणून सुरुवातीला वेगवेगळ्या ठिकाणी दोन वर्षे काम केले. आज गेली ४ वर्षांपासून साताऱ्यासारख्या शहरात सायंकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत मी वेगवेळ्या शाळेतील लहान मुलांना घेऊन जाण्याचे व घरी सुखरुप सोडण्याचे काम करत असल्याचे समाधानी उत्तर सुजाता यांनी दिले. त्यांची दोन्ही मूल त्यांच्या कमाईतून उच्च शिक्षण घेत आहेत.
स्कूल बस चालक म्हणून काम करण्यात मला जो आनंद मिळतो तो खूप समाधानी आहे. आज जरी मी छोटी स्कूल बस चालवत असली तरी भविष्यात मी मोठी बस घेऊन ती चालवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शेवटी ज्या गोष्टीत आपणास समाधान मिळते ते काम आपण करावे त्या प्रमाणे मी हे काम आनंदाने करीत आहे.
- सुजाता सोनटक्के