आम्ही नाटक बघणार आहोत, तुम्हीही बघा
By admin | Published: October 28, 2015 11:58 PM2015-10-28T23:58:56+5:302015-10-29T00:08:11+5:30
‘शिवाजी अंडरग्राऊंड..’ : गडहिंग्लज येथे लोकशाही, समतावादीतर्फे प्रांतांना निवेदन
गडहिंग्लज : ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकावर बंदीच्या मागणीसाठी काही संघटनांनी घेतलेले आक्षेप निराधार व चुकीचे आहेत. आम्ही नाटक बघणार आहोत. सर्व रसिकांनाही ते पाहण्याचे स्वातंत्र्य असून, तुम्हीही नाटक बघा आणि शिवरायांचे माणूसपण नव्याने समजून घ्या, असे आवाहन येथील लोकशाही व समतावादी पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून नाटकाला विरोध करणाऱ्यांना केले आहे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे गडहिंग्लज येथील बॅ. नाथ पै विद्यालयाच्या जनता खुले नाट्यगृहात ५ नोव्हेंबर २०१५ रोजी हे नाटक आयोजित करण्यात आले आहे. त्या नाटकावर बंदी घालावी व नाट्यप्रयोग रद्द करावा, अशी मागणी शिवसैनिकांसह शिवप्रेमींनी केली आहे. त्यासंदर्भात हे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे, २०१२ मध्ये मराठी रंगभूमीवर आलेल्या या नाटकाचे महाराष्ट्रभर सुमारे १ हजार प्रयोग झाले आहेत. त्यास सेन्सॉर बोर्डाने रीतसर परवानगी दिली आहे. नाटकांत वापरलेल्या काही वस्तू व साधने प्रतीके म्हणून वापरण्यात आली आहेत. त्याचा वेगळा अर्थ काढून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न चुकीच्या समजुतीतून झाला आहे.
सर्व लोकशाही, समता व बंधुताप्रिय रसिकांनी सहकुटुंब पाहावे असे हे सुंदर नाटक आहे. शिवरायांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाशझोत टाकणारे हे नाटक सर्वांनी शांतपणे पाहावे आणि खरे-खोटे, सत्य-असत्याची खात्री करावी, असे आवाहन केले आहे. निवेदनावर माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे, प्रा. स्वाती कोरी, कॉ. उज्ज्वला दळवी, प्रा. प्रकाश भोईटे, रमजान अत्तार, आशपाक मकानदार, महेश सलवादे, कॉ. अशोक जाधव, पी. डी. पाटील, सुरेश पोवार, प्रा. रमेश तिबिले, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)