...पण आम्ही घरी जाऊ शकत नाही....: नि:शब्द, काळीज चिरणारा; आवाहनाला साद देण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 09:39 PM2020-04-02T21:39:29+5:302020-04-02T21:44:42+5:30
असाच काळीज चिरणारा, नि:शब्द करणारा अवघा सव्वा मिनिटाचा व्हिडीओ आता कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून तो तयार करण्यात आला आहे. त्यातून तरी हुल्लडबाजी करणाऱ्यांनी, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांनी मानवी मनाला मुरड घालण्याची वेळ आली आहे.
कोल्हापूर : पोलीस हासुद्धा माणूसच आहे. त्याला कोरोना विषाणूची भीती नाही का?, तेसुद्धा कोणाचे तरी पती, पत्नी, वडील, आई, भाऊ, बहीण आहेतच. काळजी करणारं आपल्यासारखं त्यांचंही कुटुंब आहेच. त्यांनासुद्धा घर आहे, त्यांच्याही घरी त्यांची चिमुकली मुलं, वृद्ध माता-पिता वाट पाहतात.... पण तरीही ते घरी जाऊ शकत नाहीत. का? तर ते तुम्हां-आम्हांला आपलं कुटुंब मानतात आणि त्याची काळजी घेणं हेच ते प्रथम कर्तव्य समजतात.
असाच काळीज चिरणारा, नि:शब्द करणारा अवघा सव्वा मिनिटाचा व्हिडीओ आता कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून तो तयार करण्यात आला आहे. त्यातून तरी हुल्लडबाजी करणाऱ्यांनी, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांनी मानवी मनाला मुरड घालण्याची वेळ आली आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभर थैमान माजले आहे. जिवावर उदार होऊन डॉक्टर, पत्रकार, सफाई कामगारांसह पोलीस सेवा बजावताना पावलोपावली दिसत आहेत. यांनाही मन आहे, त्यांची घरी काळजी करणारे आहेतच. त्यांनाही बाहेर जाऊ नको म्हणून त्यांची चिमुकली मुलं साद देत आहेत. पण सेवा हेच प्रथम कर्तव्य मानून पोलीस दुस-यांच्या कुटुंबांची काळजी करीत आहेत.
‘कोरोना’बाधित व्यक्तीचा संपर्क होऊ नये म्हणून पोलीस दल आटापिटा करीत आहे. तरीही काहीजण रस्त्यांवर भटकतात. त्यांना रोखण्यासाठी पोलीस दलाचा व्हिडीओ मनाला भावणारा आहे.
मला दोन लहान मुली आहेत... माझ्या घरी माझी आई आहे... पण आम्ही घरी जाऊ शकत नाही... आम्ही कोल्हापूर पोलीस आहोत आणि तुम्हीदेखील आमचे कुटुंबच आहात... कृपया, आम्हांला साथ द्या... तुमच्यासाठी, तुमच्या परिवारासाठी घरीच थांबा... आपल्या कोल्हापूरसाठी घरीच थांबा... काळजी करू नका, तुमच्यासाठीच आहोत आम्ही... घरी सुरक्षित जाण्यासाठी आम्हांला सहकार्य करा... आपल्या सर्वांना हे शक्य आहे... अडचण असल्यास १०० नंबरवर डायल करा... अशा पद्धतीने कोल्हापूर पोलिसांनी भावनिक साद घातली आहे. व्हिडीओमध्ये शहरातील संवेदशील ठिकाणी उभे राहून कोल्हापूर पोलीस दलातील कर्मचारी बंधू, भगिनींनी हातात कागदावर लिहिलेल्या आपल्या भावना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.
स्वत:चे कुटुंब सोडून, पोलीस दल तुम्हांलाच आपले कुटुंब मानून तुमच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरत असतील तर आपणही प्रशासनाचा एक भाग बनू या. शासनाच्या आवाहनास साथ देऊया, घरीच थांबून ‘कोरोना’वर मात करूया.