रस्ता आम्ही केला... पाव्हणं, आता या घराकडं ! कुंभोजला रस्ता लोकवर्गणीतून अतिक्रमणमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:58 AM2018-04-11T00:58:28+5:302018-04-11T00:58:28+5:30
कुंभोज : हॅलो.... पाव्हणं, आमच्याकडं यायला नीट रस्ता नसल्यानं तुम्ही यायचंच टाळलंय. आता आमचा रस्ता आम्ही केला. गाडी थेट घरापर्यंत येतेय.
कुंभोज : हॅलो.... पाव्हणं, आमच्याकडं यायला नीट रस्ता नसल्यानं तुम्ही यायचंच टाळलंय. आता आमचा रस्ता आम्ही केला. गाडी थेट घरापर्यंत येतेय. आतातरी या आमच्याकडं... कुंभोज (ता. हातकणंगले) येथील भोकरे मळ्यातील शेतकरी आदिनाथ भोकरे यांनी मोबाईलवरून पाहुण्यांना केलेली ही विनवणी. अतिक्रमणामुळे गायब झालेला पाणंद रस्ता लोकवर्गणीतून अतिक्रमणमुक्त केल्यानंतर यापूर्वी पायवाटेलाही मुकलेल्या भोकरे कुटुंबाच्या प्रमुखांनी आनंदाप्रीत्यर्थ पैै-पाहुण्यांना बोलावून घेऊन नवीन रस्ता दाखविला. इतकेच नव्हे, तर या पाणंदीने तुटलेली शेतं आणि दुभंगलेली माणसंही पुन्हा जोडली. आपलाच रस्ता आपण करणाऱ्या शेतकºयांचे या निमित्ताने गावात मोठे कौतुकही होत आ.
कुंभोज-दानोळी रस्त्यापासून दक्षिणेस डोंगर पायथ्यापर्यंत जाणारी सुमारे दोन कि. मी. अंतराची भोकरे पाणंद ३५-४० वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. तथापि, शेतकºयांनी केलेले अतिक्रमण, दोन्ही कडेने वाढलेली झाडवेली यामुळे पाणंद रस्ता पायवाटेपुरताही मोकळा राहिला नाही. परिणामी, उसासह अन्य शेतमालाची वाहतूक करणे शेतकºयांना कष्टाचे आणि खर्चिक होऊ लागले. रस्त्यासाठी एकमेकांकडून होणाºया अडवणुकीमुळे भोकरे कुटुंबीयांनी एक एकर शेती विकली, तर अनेकांनी ऊस पीक घेणे बंद केले. सतत चाळीस वर्षांपासूनच्या या समस्येवर वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील, विनायक पोतदार यांनी शेतकºयांना बळ देऊन रस्ता बनविण्यासाठी प्रवृत्त केले.
एकरी पाच हजार रुपये वर्गणी काढून सुमारे दोन लाख रुपये खर्चून पाणंद अतिक्रमणमुक्त करण्यात आली. आपल्या वाटेसाठी शेतकºयांनीच पदरमोड करून रस्त्याचा प्रश्न सोडविला. सुमारे दोन कि.मी. पाणंद वाहतुकीस खुली झाल्याने भोकरे मळ्यात वास्तव्यास असणारी चार कुटुंबे सुखावली.
रस्ता करण्यासाठी पुढाकार घेणारे अनिल भोकरे, रामा खोत, चंदू स्वामी, राजू भगत, सागर खोत, संजय भोरे, प्रकाश भोसे, रतन कोळी, प्रियदर्शन पाटील-नरंदेकर यांच्यासोबत शंभराहून अधिक शेतकºयांची रस्त्याच्या निमित्ताने एकजूट झाली आणि पाणंदीच्या रुंदीकरणाला विरोध करणारे एकमेकांच्या नुकसानीस आजवर कारण ठरलेले या भागातील शेतकºयांची शेतं वाटेमुळे पुन्हा जोडली गेली आणि रस्त्यासाठी झालेल्या वादविवादातून एकमेकांपासून दुभंगलेले शेतकरी कित्येक वर्षांनंतर हातात हात घालून या पाणंदीतूनच ये-जा करू लागले आहेत.