विधानसभेसाठीही ‘आमचं ठरलंय’!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 03:08 AM2019-06-07T03:08:15+5:302019-06-07T03:08:33+5:30
उद्धव ठाकरे; १४ खासदारांसह घेतले अंबाबाईचे दर्शन
कोल्हापूर : दोन, चार पदांसाठी आम्ही भाजपशी युती केलेली नाही. ती हिंदुत्वासाठी केलेली आहे. अमित शहा आता जे काश्मीरमध्ये करू इच्छितात त्यासाठी आम्ही युती केली आहे. आमची युती मजबूत आहे. हक्काने काही म्हणणे मांडणं म्हणजे नाराजी नव्हे. युती कदापिही तुटू देणार नाही. विधानसभेसाठी ‘आमचं ठरलंय’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका गुरुवारी स्पष्ट केली.
शिवसेनच्या १८ पैकी १४ विजयी खासदारांसह उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी अंबाबाईचे दुपारी दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय अवजड उद्योेग मंत्री अरविंद सावंत उपस्थित होते. १६ जूनला खासदारांसह आपण अध्योध्येला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाकरे म्हणाले, आम्ही अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन युतीची पहिली सभा कोल्हापुरात घेतली. उपस्थितांच्या रूपाने जे अंबाबाईचे विराट रूप आम्हाला दिसले तेव्हा मी या गर्दीला सलाम केला होता. आता पुन्हा नतमस्तक होण्यासाठी आलो होतो.
युतीचे तुमचे जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा ठरला आहे असे विचारल्यावर ते म्हणाले, विधानसभेसाठी आमचं ठरलंय. काही अडचण नाही. युती मजबूत आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर मी आणि आदित्य रविवारी जाणार आहोत. चारा छावण्यांमध्ये जे शेतकरी राहत आहेत त्यांसाठी अन्नधान्य घेऊन जाणार आहोत. सरकार त्यांच्या परीने चांगले काम करीत आहे. परंतु, एकटे सरकार पुरे पडणार नाही. दुष्काळग्रस्तांची आपुलकीने चौकशी करायला आम्ही जाणार आहोत. त्यांच्यासाठी करेल तेवढं थोडं आहे; मात्र दिलासा देणे गरजेचे आहे.
बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती
‘राज्यात युतीची सत्ता यावी आणि कोल्हापूरचे दोन खासदार शिवसेनेचे येऊ देत, तुझी खणानारळाची ओटी भरीन’अशा शब्दात शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी करवीर निवासिनी अंबाबाईला बोललेले नवस गुरुवारी त्यांचे सुपुत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी फेडले. ठाकरे परिवाराने केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांच्यासह १४ खासदारांसोबत अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले, तसेच देवीला साडी, खणानारळाची ओटी भरली. ‘शिवसेनेवर यापुढेही अशीच कृपा ठेव’ अशी भावनिक साद उद्धव ठाकरे यांनी देवीला घातली.