आमचं ठरलंय, तसंच घडलंय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 01:19 AM2019-05-24T01:19:27+5:302019-05-24T01:19:32+5:30
कोल्हापूर : अटीतटीची लढत होईल असे सर्वांचे अंदाज उधळून टाकत शिवसेनेचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे ...
कोल्हापूर : अटीतटीची लढत होईल असे सर्वांचे अंदाज उधळून टाकत शिवसेनेचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांचा तब्बल दोन लाख ७४ हजार मतांनी पराभव करत धुव्वा उडवला. कोल्हापूर मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांमधून मंडलिक यांनी एकतर्फी मताधिक्य घेतले. एकाही मतदारसंघामध्ये मंडलिक यांनी महाडिक यांना मान वर करू दिली नाही. परिणामी उच्चांकी मतदान घेत मंडलिक यांनी शिवसेनेचा भगवा फडकाविला. रात्री उशिरा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अधिकृत निकाल जाहीर केला आणि मंडलिक यांना प्रमाणपत्र दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : संजय मंडलिक यांच्या मागे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह शिवसेनेच्या सर्वच आमदारांनी लावलेली ताकद, काँग्रेसचेच आमदार सतेज पाटील यांनी दिलेले बळ यामुळे महाडिक यांच्या तोंडाला अक्षरश: फेस आला. निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रत्येक टप्प्यावर महाडिक बॅकफूटवर आल्याचे दिसत होते. त्याचेच प्रत्यंतर निकालामध्ये दिसून आले.
गुरुवारी सकाळी आठ वाजता रमणमळा येथील शासकीय गोदामामध्ये मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. एकीकडे पोस्टलचे मतदान सुरू असतानाच दुसरीकडे ईव्हीएम मशीनवरचीही मोजणी सुरू झाली. तासाभरातच पहिल्या फेरीत सर्व विधानसभा मतदारसंघांतून संजय मंडलिक हे १९,६८५ मतांनी आघाडीवर असल्याची माहिती बाहेर आली. याची चर्चा सुरू झाली असतानाच दुसऱ्या फेरीमध्ये मंडलिक यांनी ३४ हजार ६२४ मतांची आघाडी घेतली. पहिल्या फेरीपासून मंडलिक यांनी जी आघाडी घेतली, ती अगदी २२ व्या फेरीअखेर कायम ठेवली.
दुपारी साडेबाराच्या दरम्यान दहावी फेरी झाली आणि एक लाख ६0 हजार ८८१ मतांनी मंडलिक यांनी आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले. १५ व्या फेरीअखेर मंडलिक यांचे मताधिक्य दोन लाख ३३ हजारांवर गेले. याच पद्धतीने मताधिक्य वाढत २२ व्या फेरीअखेर संजय मंडलिक यांनी महाडिक यांच्यापेक्षा तब्बल दोन लाख ७४ हजार मतांचे मताधिक्य घेऊन कोल्हापूर मतदारसंघात इतिहास घडविला. वंचित बहुजन आघाडीच्या अरुणा माळी यांना ६३ हजार ४३९ मते मिळाली.
पहिल्या फेरीपासूनच मंडलिक यांनी आघाडी घेतल्याने एकीकडे मंडलिक समर्थक उत्साही होते, तर महाडिक समर्थकांच्या चेहºयावर अस्वस्थता दिसू लागली. मात्र, पाचव्या फेरीनंतर मंडलिक यांनी ९३,९३0चे मताधिक्य घेतल्यानंतर महाडिक समर्थकांनी काढता पाय घेतला. महाडिक यांचे चिरंजीव पृथ्वीराज, सत्यजित कदम, जयंत पाटील, मुरलीधर जाधव हे मतमोजणी केंद्रावरून निघून गेले.
दुपारी तीनच्या सुमारास मंडलिक यांनी १४ व्या फेरीअखेर दोन लाख ३६ हजारांचे मताधिक्य घेतल्याने कार्यकर्त्यांना मंडलिक कधी येणार याची उत्सुकता होती. साडेतीन वाजता गुलालाने माखलेले मंडलिक आणि आमदार प्रकाश आबिटकर मतमोजणी
केंद्रावर आले. ते आल्यानंतर त्यांच्या विजयाच्या घोषणा सुरू झाल्या. यानंतर मंडलिक यांनी प्राचार्य महादेव नरके यांच्याशेजारी बसत त्यांच्यासह राजेखान जमादार, सुनील मोदी
यांच्याकडून आढावा घेतला. यानंतर मीडिया सेंटरमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद
साधला. आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार चंद्रदीप नरके हे देखील यावेळी उपस्थित
होते.
धनंजय महाडिक फिरकलेच नाहीत
सुरुवातीपासूनच मंडलिक यांनी आघाडी घेतल्याने आणि सकाळी ११ नंतरच हे मताधिक्य रोखता येणार नाही हे स्पष्ट झाल्याने धनंजय महाडिक यांनी मतमोजणी केंद्राकडे येणेच टाळले. याचवेळी त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज हे देखील कार्यकर्त्यांकडून आकडे घेत बसून होते. मात्र, त्यांच्या चेहºयावरील नाराजी स्पष्टपणे दिसत होती. थोड्या वेळाने त्यांच्या समर्थकांनीही थोड्या वेळाने येथून निघून जाणे पसंद केले.
शार्टसर्किटमुळे घबराट
मीडिया सेंटरच्या पलीकडेच उमेदवारांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी कुलर ठेवण्यात आला होता. त्याच्या केबलवर सोफा सेट ठेवल्याने केबल कट होऊन साडेदहाच्या सुमारास या ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. मोठ्या प्रमाणावर ठिणग्या उडाल्याने पत्रकार आणि छायाचित्रकारांची धावपळ उडाली.
सुनील मोदी यांचा अंदाज ठरला खरा
मंडलिक यांच्या प्रचाराचे नियोजन करणाºया सुनील मोदी यांनी गेल्या सहा महिन्यांपासून मंडलिक यांच्यासाठी जोडण्या सुरू केल्या होत्या. सर्व विधानसभा मतदारसंघांचा अभ्यास करून त्यांनी एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून टक्केवारीचा आधार घेत मंडलिक हे सव्वादोन लाख मतांनी विजयी होतील, असे भाकीत वर्तविले होते. मात्र, युतीच्या अनेकांनी त्यांना वेड्यात काढले होते. मात्र, मोदी यांच्या अंदाजापेक्षाही मंडलिकांनी अधिक मते मिळवत बाजी मारली.
व्हीव्हीपॅटच्या पडताळणीला वेळ
वास्तविक सर्वच मतदारसंघांतील ईव्हीएम मशिन्सची मोजणी चार ते साडेचारच्या दरम्यानच संपली होती. मात्र, त्यानंतर व्हीव्हीपॅटवरील पडताळणी आणि इतर प्रक्रियेमध्ये बराच वेळ गेला. राधानगरी विधानसभा मतदारसंघाच्या २२ फेºया असतानाही मोजणी २ वाजून ४0 मिनिटांनी संपली. पावणेसात वाजता व्हीव्हीपॅटची पडताळणी संपली. यावेळी केळोशी खुर्द, गंगापूर, पिंपळवाडी, कासारपुतळे आणि वाघवडे या गावांची पडताळणी करण्यात आली. संपत खिलारी यांनी येथे काम पाहिले.
चंदगडची मतमोजणी साडेतीनला संपली. येथे विजया पांगारकर यांच्या नेतृत्वाखाली १९ फेºया मोजण्यात आल्या. यानंतर किणे, घुलेवाडी, कुमरी, वाघराळी आणि पेद्रेवाडी येथील केंद्रांच्या मतदानाची पडताळणी करण्यात आली.
करवीरमध्ये वैभव नावडकर यांच्या नेतृत्वाखाली १८ फेऱ्यांची मोजणी ३ वाजून २0 मिनिटांनी संपली. यानंतर कासारवाडी, मांजरवाडी, कळे, हासूर दुमाला, सावर्डे दुमाला येथील मतदानाची व्हीव्हीपॅटद्वारे पडताळणी करण्यात आली.