आम्ही माणसांत देव पाहिला; जवानांच्या पाया पडणाऱ्या महिलेकडून आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 07:58 PM2019-08-11T19:58:21+5:302019-08-11T19:59:06+5:30
सध्या सोशल मीडियावर कोल्हापुरातील पुरातून सैन्यदलातील जवानांनी होडीतून सुखरूपपणे बाहेर काढताना त्यांच्या पाया पडणाऱ्या महिलेच्या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे.
- प्रदीप शिंदे
कोल्हापूर : तुला पुजलं राऊळात... तुला पाहिलं दगडात... दगडाचा तू... दगडाचं काळीज... नदीआई कोपली... बा ज्योतिबा रुसला... माझ्या गं मदतीला देवमाणूस धावला... देव माणसातच दडलाय... वर्दीतला देवदूत जीवनदान देऊन गेला... असाच अनुभव आंबेवाडी येथील सुजता आंबी यांना आला.
सध्या सोशल मीडियावर कोल्हापुरातील पुरातून सैन्यदलातील जवानांनी होडीतून सुखरूपपणे बाहेर काढताना त्यांच्या पाया पडणाऱ्या महिलेच्या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे. या सुजाता मिलिंद आंबी यांच्याकडून ‘लोकमत’ने सर्व परिस्थिती जाणून घेतली.
आंबेवाडी येथील आंबी गल्ली येथील सुजाता आंबी यांचे एकत्रित कुटुंब आहे. घरात एकूण १६ सदस्य आहेत. जनार्दन आंबी हे कुटुंबप्रमुख. त्यांना चार मुले मदन, मोहन, मिलिंद. हे शेती व्यवसाय व गुऱ्हाळघर पाहतात. सर्वांत धाकटे आहेत ते मुकुंद आंबी हे वीज कंपनीत उपकार्यकारी अभियंता आहेत.
सोमवारी (दि. ५) पाऊस सुरू झाल्यानंतर आंबी यांनी नवीन बांधलेल्या जवळच्या तीनमजली घरामध्ये स्थलांतर केले. पावसामुळे परिस्थिती बिकट झाली. प्रथम चिखली गाव पाण्यात गेले. गावातील लोकांनी स्वत:चा जीव वाचविण्यासाठी दुभती जनावरे पाण्यात सोडली. पुराचे पाणी वाढल्याने आमचे घर गावांतील अन्य लोकांसाठी खुले केले.
मंगळवारी गावाला पाण्याने वेढा घातल्याने सुमारे २०० नागरिक यांच्या घरामध्ये राहण्यास होते. घर उंचावर असल्याने घरामध्ये पाणी येत नव्हते. मात्र वीज नाही, मोबाईल चार्जिंग नाही, एकही रस्ता वाहतुकीसाठी खुला नाही; त्यामुळे बाहेरगावांतील लोकांचा संपर्क तुटला. बुधवार (दि. ७) पर्यंत तिथेच राहिलो. घरामध्ये २०० माणसांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. मात्र तेही अन्नधान्य संपू लागले. मदतीसाठी संपर्क करण्यात येत होता; मात्र संपर्क होत नव्हता. यामध्ये पाणी वाढत असताना सांगलीतील ब्रह्मनाळ येथे पूरग्रस्तांना वाचविताना बोट बुटून लोकांना जलसमाधी मिळाली, ही बातमी कानांवर पडल्याने पायांखालची जमीनच सरकली.
गुरुवारी दुपारी गावामध्ये सैन्यदलाच्या बोटी येऊ लागल्या. आम्ही प्रथम गावातील महिलांना व लहान मुलांना बोटीतून पुढे पाठविले. शेवटी आम्ही कुटुंबातील सगळे सदस्य एका बोटीत बसलो. बोटीत बसताना ब्रह्मनाळ येथील घटना आठवल्याने धाडस होत नव्हते; कारण घरातील लहान मुले, महिला होत्या. सैन्यदलातील लोकांनी ‘आम्ही सोबत आहोत; काळजी करू नका,’ असे सांगून मनोबल वाढविले. पुढे जातो तर एक साप आडवा आला, आता साप बोटीत शिरला तर मोठा अनर्थ होईल, असे वाटत असतानाच एका जवानाने वल्ह्याच्या साहाय्याने साप दूर फेकला आणि समोरचे संकट टळले. अजून काठ दूर होता. धाकधुक वाढलीच होती. तशीच दहा मिनिटे गेली तरी वाट सरत नव्हती. तेवढ्यात काठ आणि माणसे दिसू लागल्याने जिवात जीव आला.
काठावर बोट येताच आमच्यासोबत माणसांच्या रूपाने देवच सोबत होते ही भावना डोळ्यांसमोर आल्याने दोघा जवानांचे पाय आपोआपच धरल्याचा अनुभव सुजाता आंबी यांनी सांगितला. कोल्हापुरातील संभाजीनगर येथील निकम पार्क येथे हे कुटुंबीय स्थलांतरित झाले आहे. या ठिकाणी आंबी कुटुंबीयांना भेटण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.