जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही एकत्रच
By admin | Published: September 27, 2016 12:29 AM2016-09-27T00:29:41+5:302016-09-27T00:44:34+5:30
हद्दवाढ किंवा प्राधिकरण मुद्दा गौण : ‘कोल्हापूर शहर हद्दवाढ : प्राधिकरणाची भूमिका’ परिसंवादातील सूर
कोल्हापूर : जिल्ह्याचा विकास हाच आमच्यापुढील एकमेव अजेंडा असून, जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. त्यामुळे हद्दवाढ किंवा प्राधिकरण हा मुद्दा गौण आहे. केवळ जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही सकारात्मक भूमिका घेऊ, असा सूर ‘कोल्हापूर शहर हद्दवाढ : प्राधिकरणाची भूमिका’ या विषयावर महावीर महाविद्यालय भूगोल विभागाच्यावतीने सोमवारी आयोजित परिसंवादामध्ये निघाला. या परिसंवादाचे उद्घाटन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अॅड. के. ए. कापसे होते.
आमदार क्षीरसागर म्हणाले, हद्दवाढ ही नैसर्गिक गोष्ट आहे. कारण वाढत्या शहरीकरणामुळे नागरी समस्याही वाढू लागल्या आहेत. त्यामुळे शहराच्या विकासाकरिता निधी हवा. यासाठी हद्दवाढीमध्ये १८ गावांचा समावेश आवश्यक होता. त्यात हद्दवाढ नको म्हणणाऱ्यांनी निधी नाही म्हणून आमच्या गावांचा समावेश करत असल्याचा आरोप केला आहे. हा आरोप चुकीचा आहे. अमृत योजनेतून कोल्हापूर शहराला १२५ कोटी रुपयांचा निधी आला. याशिवाय रिंग रोडच्या बांधणीसाठी १०९ कोटी खर्च झाले आहेत, तर एसटीपी प्लँट, आदी विकासाची कामे झाली. एखाद्या जमिनीवर आरक्षण टाकण्याची प्रक्रिया पालिकेकडे नसून टाऊन प्लॅनिंगकडे असते, हा गैरसमज दूर व्हावा. शेतजमिनीला हात न लावता विकास होणे गरजेचे आहे. आपल्यासाठी शहर आणि ग्रामीण वेगळे नाही. आमचा लढा शहरासह जिल्ह्याच्या विकासासाठी आहे.
आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, ग्रामीण जनतेच्या भावना लक्षात घेऊन हद्दवाढीला विरोध केला. हद्दवाढ झाल्यानंतर विकास होईल हा समज चुकीचा आहे. आमचा दुग्ध व्यवसाय महिला पाहत आहेत. त्याची बिलेही दहा दिवसांत मिळतात. याशिवाय घरफाळा, करही कमी आहे. प्रथम महापालिका क्षेत्राचा विकास तुम्ही तुमच्या पातळीवर करा. त्यातून तुमचे भले झाले तर आम्हीही सहभागी होऊ. याशिवाय पालिकेने विकासाकरिता ४०० कोटी व १८ गावांच्या प्राधिकरणाच्या माध्यमातून ४०० कोटी असा एकूण ८०० कोटींचा विकास निधी आणू. हा निधी जिल्ह्याला उपयोगी पडेल. त्यामुळे जिल्ह्याचा विकास होऊ दे.
माजी आमदार संपतबापू पाटील म्हणाले, हद्दवाढ ही ग्रामीण जनतेच्या मुळावर बसणारी आहे. त्यामुळे आमचा विरोध आहे. प्राधिकरणाच्या रूपाने १८ गावांचा विकास निश्चित होणार आहे. त्यात ग्रामपंचायतींचे अधिकार शाबूत राहणार असून लोकसंख्येची अटही केंद्र सरकारने काढली आहे. महापालिका क्षेत्राचाही विकास व्हावा व या ग्रामपंचायतींचाही विकास व्हावा.
परिसंवादात माजी महापौर अॅड. महादेवराव आडगुळे, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, हद्दवाढविरोधी कृती समितीचे प्रवक्ते नाथाजी पोवार, पीटर चौधरी यांनी भूमिका मांडली.
यावेळी प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे, संस्था सचिव महावीर देसाई, प्रा. रामदास तुरके, रेश्मा शेळके, प्रियांका विभूते, आदी विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
————-
————
फोटो : २६०९२०१६-कोल-महावीर
फोटोओळी :
समर्थक-विरोधक प्रथमच एकत्र
हद्दवाढविरोधी भूमिका घेणारे आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार संपतबापू पाटील यांच्यासह हद्दवाढीचे समर्थन करणारे राजेश क्षीरसागर, राजेश लाटकर, आदी मान्यवर प्रथमच शहरासह जिल्ह्याच्या विकासाकरिता एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचे चित्र दिसले.