जाजम अंथरायला आम्ही, तिकिटावेळी पैसेवाले
By admin | Published: September 10, 2015 12:40 AM2015-09-10T00:40:40+5:302015-09-10T00:40:40+5:30
महापालिका निवडणूका : द्वारबंद बैठकीत संतप्त कार्यकर्त्यांनी कॉँग्रेस शहराध्यक्षांनाच धरले धारेवर
कोल्हापूर : ‘कॉँग्रेस समितीत जाजम, खुर्च्या टाकायला आम्ही चालतो; कोणाचा प्रचार करायचा तर आमची आठवण येते. निष्ठावान म्हणून आम्हीही ते काम प्रामाणिकपणे करतो; मात्र महानगरपालिकेची निवडणूक आली की आमचा कोणी विचार करत नाही. ज्यांच्याकडे पैसे आहेत, अशांचाच विचार केला जातो. जर तुम्ही पक्षाची उमेदवारी देणार नसाल तर कशाला पक्षासाठी राबायचं?...’ अशा शब्दांत कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांना कार्यकर्त्यांनी बुधवारी खडे बोल सुनावले.
शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण हे स्पष्टपणे तसेच परखडपणे बोलण्यात माहीर आहेत; परंतु बुधवारी जेव्हा कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांनाच स्पष्ट शब्दांत सुनावले तेव्हा चव्हाण यांची बोलतीच बंद झाली. कार्यकर्त्यांची आक्रमकता पाहून बैठक अर्ध्या तासात संपवावी लागली.
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांच्या भावना काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी प्रल्हाद चव्हाण यांनी बुधवारी कॉँग्रेस समितीत शहर हद्दीतील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. मुळात या बैठकीकडे अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाठ फिरविली होती; पण जे उपस्थित होते त्यांनी मात्र पक्षाच्या धोरणावर हल्ला चढविला.
कॉँग्रेसकडील अनेक कार्यकर्ते सर्वसामान्य आहेत. त्यांच्या जिवावर नेतेमंडळी मोठी होतात. कोणी आमदार, मंत्री, पदाधिकारी होतात; पण सत्तेत गेल्यावर मात्र त्यांना या सामान्य कार्यकर्त्यांचा विसर पडतो. शेवटी आमची कामे आम्हालाच करावी लागतात. आम्ही त्यालाही समर्थ आहोत. प्रत्येक वेळी निवडणुका आल्या की कार्यकर्त्यांना बोलाविता. नंतर मात्र हेच कार्यकर्ते काय करतात, कोठे असतात याचा कोणीच विचार करीत नाही. त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या जात नाहीत. आता महानगरपालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत. कार्यकर्त्यांची अपेक्षा असते की, आपणही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी; पण प्रत्यक्षात कार्यकर्त्यांचा अवमान करून कोणातरी पैसेवाल्याला उमेदवारी दिली जाते, हे बंद झाले पाहिजे, अशा प्रकारच्या संतप्त भावना कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केल्याचे समजते.
कॉँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणांना घराघरांत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अवमान करून कोणाला तिसऱ्याच व्यक्तींना पक्षाची उमेदवारी देणार असेल तर आम्हालाही विचार करावा लागेल, अशा शब्दांत इशारा देण्यात आला.
कार्यकर्त्यांनी खडे बोल सुनावल्यामुळे प्रल्हाद चव्हाण हतबल झाले आणि त्यांनी ही बैठकच आटोपती घेतली. या बैठकीच्या निमित्ताने ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉँग्रेस कार्यकर्त्यांची खदखद स्पष्ट झाली.
बिंग फुटू नये म्हणून...
कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र स्वरूपाच्या आहेत, याची कुणकुण लागलेल्या शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी उपस्थित सर्व पत्रकारांना उद्देशून आपणास बैठकीचे निमंत्रण दिले नसल्याचे सांगत कॉँग्रेस समितीतून बाहेर जाण्यास सांगितले; परंतु कार्यकर्त्यांनी मात्र बैठकीतील माहिती पत्रकारांपर्यंत पोहोचविलीच. (प्रतिनिधी)