उपाययोजना करायचीय, पण निधी कोण देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:25 AM2021-04-02T04:25:40+5:302021-04-02T04:25:40+5:30
समीर देशपांडे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कुठेही देशभरात किंवा राज्यात शासकीय रुग्णालयात आग लागली की, मग मुंबई, पुण्याहून ...
समीर देशपांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कुठेही देशभरात किंवा राज्यात शासकीय रुग्णालयात आग लागली की, मग मुंबई, पुण्याहून परिपत्रक काढले जाते. स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करून घेण्याच्या सूचना दिल्या जातात. परंतु त्यासाठी आवश्यक निधी वेळेत कधीच मिळत नसल्याचे वास्तव आहे. आता सुध्दा सीपीआरमध्ये लागलेल्या आगीनंतर सुमारे ९ कोटी रुपयांच्या उपाययोजना सुचवणारा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला आहे. आता कधी निधी मिळणार, याची प्रतीक्षा आहे.
ऐन कोरोना भरात असताना सीपीआरमधील ट्राॅमा केअर सेंटरमध्ये २८ सप्टेंबर २०२० च्या पहाटे ३ वाजून २१ मिनिटांनी आग लागली होती. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला होता. यानंतर डाॅ. बी. एम. माळी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने सीपीआर इमारतीचे स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्ताव तयार करून तो जानेवारी २०२१ च्या पहिल्या आठवड्यात आरोग्य विभागाच्या मुख्यालयाकडे सादर करण्यात आला होता. त्यातील त्रुटी काढून फेरप्रस्ताव मार्च महिन्यात पुन्हा पाठविण्यात आला आहे. आता यासाठीचा आवश्यक सुमारे ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर मग कामांना सुरुवात होणार आहे
चौकट
आधीचा प्रस्ताव धूळ खात
कोल्हापूर महापालिकेने १७ एप्रिल २०१२ आणि त्यानंतर ४ सप्टेंबर २०१७ ला सीपीआरचे फायर ऑडिट केले होते. यामध्ये १ लाख लिटर क्षमतेची पाण्याची स्वतंत्र टाकी, संपूर्ण सीपीआरला यार्ड हायडंट्र सिस्टिम बसवणे, या परिसरातील २७ इमारतींमध्ये फायर एन्स्टियुशर एबीसी, सीओटू बसवणे यासह अन्य उपाययोजना सुचविणारा साडेचार कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र तो तीन वर्षे धूळ खात पडला आहे आणि आता दुसरा नऊ कोटी रुपयांचा प्रस्ताव नव्याने सादर करण्यात आला आहे.
चौकट
गॅस एरिया अलार्म सिस्टिममधील बिघाडामुळे आग
याबाबत नेमलेल्या चौकशी समितीने, सीपीआरच्या ट्राॅमा केअर सेंटरमध्ये लागलेली आग ही मेडिकल गॅस एरिया अलार्म सिस्टिम बाॅक्समधील तांत्रिक बिघाडामुळे लागल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. ही आग इलेक्ट्रिक शाॅर्टसर्किटमुळे लागलेली नाही किंवा व्हेन्टिलेटरमधील ऑक्सिजन गळतीमुळे लागलेली नाही, असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
कोट
सीपीआरचे स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करून घेण्यासाठी ८ कोटी ८१ लाख रुपयांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात आला आहे. निधी मंजूर झाल्यानंतर तातडीने ही प्रक्रिया सुरू केली जाईल.
- डाॅ. एस. एस. मोरे
अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर